Ladakh Protest: लेहमध्ये केंद्रशासित प्रदेश लडाखला (Ladakh violent protests) पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी हिंसक निदर्शने झाली. विद्यार्थ्यांची पोलिस आणि सुरक्षा दलांशी झटापट झाली. त्यांनी भाजप कार्यालयाला (Ladakh BJP office set on fire) आग लावली, पोलिसांवर दगडफेक केली आणि सीआरपीएफच्या वाहनाला आग लावली. गेल्या 15 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हे विद्यार्थी आंदोलने करत होते. आंदोलकांनी आज बंदची हाक दिली होती, ज्यामुळे हिंसाचार झाला.

हा लडाखसाठी दुःखद दिवस, मूर्खपणा थांबवण्याचे आवाहन करतो

हिंसाचारानंतर वांगचुक म्हणाले, "हा लडाखसाठी दुःखद दिवस आहे. आम्ही पाच वर्षांपासून शांततेच्या मार्गावर चालत आहोत. आम्ही उपोषण केलं, लेहहून दिल्लीपर्यंत पायी चाललो. आज, आम्ही शांतीचा संदेश अपयशी होताना पाहत आहोत. हिंसाचार, गोळीबार आणि जाळपोळ होत आहे. मी लडाखच्या तरुण पिढीला हे मूर्खपणा थांबवण्याचे आवाहन करतो. आम्ही आमचे उपोषण सोडत आहोत आणि निदर्शने थांबवत आहोत." या मागण्यांबाबत पुढील बैठक 6 ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार आहे. 2019 मध्ये कलम 370 आणि 35अ रद्द करण्यात आले तेव्हा जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनले. राज्यातील परिस्थिती सामान्य झाल्यावर पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.

एक दिवस आधी सोशल मीडियावर नियोजन

सरकारने मागणीला त्वरित प्रतिसाद दिला नाही किंवा कोणत्याही चर्चेचे संकेत दिले नाहीत. त्यामुळे, मंगळवारी सोनम यांच्या समर्थकांनी लेहमधील हिल कौन्सिल कार्यालयासमोर निदर्शने करण्याची योजना आखली. लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यापासून हिल कौन्सिल कार्यालय हे सर्वात महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र आहे. आदल्या रात्री सोशल मीडिया चॅनेलद्वारे निषेधाचे आवाहन करण्यात आले.

हजारो लोकांचा जमाव जमला

बुधवारी सकाळी लेहमधील हिल कौन्सिल कार्यालयाबाहेर हजारो लोक जमू लागले. लडाख पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी आधीच बॅरिकेड्स उभारले होते. सुरुवातीला, निदर्शक आणि पोलिसांमध्ये वाद झाला, जो नंतर हाणामारीत रूपांतरित झाला. पोलिस आणि निदर्शकांमध्ये संघर्ष झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तथापि, संतप्त जमावाने प्रथम पोलिसांचे वाहन पेटवून दिले आणि त्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. काही निदर्शकांनी जवळच्या भाजप कार्यालयात घुसून ते पेटवून दिले आणि तोडफोड केली. दगडफेकीत काही लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

इतर महत्वाच्या बातम्या