Rajpal Yadav Cheating Case : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) हा त्याच्या अभिनयानं आणि विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. राजपाल यादव  त्याच्या चित्रपटामधील अभिनयामुळे चर्चेत असतो. पण सध्या राजपाल हा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. राजपाल यादव याच्यावर 20 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता इंदूर पोलिसांनी त्याला नोटिस पाठवली आहे. 


काय आहे प्रकारण? 
रिपोर्टनुसार, राजपाल यादव यांच्यावर एका बिल्डरनं वीस लाखांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. राजपालवर सुरिंदर नावाच्या बिल्डरनं फसवणूकीचा आरोप केला आहे.  पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये सुरिंदरनं सांगितले आहे की, राजपाल यादवनं सुरिंदरच्या मुलाला बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्यासाठी सुरिंदरकडून  20 लाख रुपये घेतले होते. पण राजपालनं सुरिंदरच्या मुलाला बॉलिवूडमध्ये काम मिळवून दिलं नाही आणि त्यानंतर  राजपालनं सुरिंदरचा फोन उचलणं देखील बंद केलं. सुरिंदर म्हणाला की, 'राजपाल यादवनं फोन उचलणं बंद केल्यानं कंटाळून त्यानं पोलिसात तक्रार दाखल केली.'  त्यानंतर या प्रकरणावर कारवाई करत पोलिसांनी राजपालविरोधात नोटीस बजावली असून त्याला 15 दिवसांत हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत. 


याआधी देखील फसवणूकीच्या प्रकरणात अडकला होता राजपाल
पाच कोटींची फसवणूकी केल्याच्या प्रकरणी राजपाल यादवला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली होती. काही दिवसांपूर्वी 'भूल भूलैय्या-2' हा राजपाल यादवचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हंगामा, रेस अगेन्स्ट टाइम, चुप चुप के, गरम मसाला, फिर हेरा फेरी, ढोल या चित्रपटांमध्ये राजपालनं काम केलं आहे. 


हेही वाचा: