Rajinikanth Raj Bahadur Friendship : 'दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा'... कवी अनंत राऊत यांनी खूप सुंदर शब्दात मैत्रीची व्याख्या केली आहे. खरा दोस्त मैत्रीत जात, पात, वर्ग, भेद आजिबात पाळत नाही. आपल्या मित्रासाठी कायपण अशी भावना घेऊन निस्वार्थपणे आपल्या मित्राची साथ देत असतात. अशाच एका मित्रामुळं सुपरस्टार रजनीकांत यांचं आयुष्य घडायला मोलाची साथ लाभली. राज बहादूर असं रजनीकांत यांच्या मित्राचं नाव.
दिग्गज अभिनेते रजनीकांत यांना नुकताच मानाचा दादा साहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानीत केलं गेलं. हा पुरस्कार जिंकल्यानंतर रजनीकांत यांनी हा पुरस्कार मी माझ्या मित्र बस ड्रायव्हर आणि सोबती राज बहादूर यांना समर्पित करतो, असं सांगितलं. राज बहादूर हे ते व्यक्ति आहेत ज्यांनी माझ्यातील अभिनयाचं टॅलेंट पाहून मला चित्रपटात काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं, असं रजनीकांत यांनी सांगितलं. राज बहादुर यांनीच रजनीकांत अर्थात शिवाजीराव गायकवाड यांना तामिळ शिकवली आणि अभिनयाच्या क्षेत्रात पाठवलं.
रजनीकांत यांचा प्रत्येक चाहता राज बहादुर आणि त्यांच्या मैत्रीबद्दल जाणून आहे. दोघांची मैत्री जवळपास 50 वर्ष जुनी आहे. ही मैत्री सुरु झाली ती दोघे एका बसमध्ये ड्रायव्हर आणि कंटक्टर असताना. नुकतंच राज बहादूर यांनी सांगितलं होतं की, आमची मैत्री 50 वर्ष जुनी आहे. मी रजनीकांत यांना 1970 मध्ये भेटलो. ज्यावेळी त्यांनी काम सुरु केलं होतं. मी त्यावेळी ड्रायव्हर होतो. ते आमच्या ट्रान्स्पोर्ट स्टाफ ग्रुपचे सर्वात चांगले अभिनेते होते. आमच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. तिथं रजनी स्टेजवर परफॉर्म करायचे, असं बहादूर यांनी सांगितलेलं.
Rajinikanth Meets PM Modi : सुपरस्टार रजनीकांतने घेतली राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट
बहादूर यांनी सांगितलं होतं की मी त्याला चेन्नई जाण्यासाठी हट्ट केला आणि अॅक्टिंग स्कूल ज्वाईन करायला सांगितलं. त्यानं अॅक्टिंग कोर्सचे दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर इंस्टीट्यूटनं एक कार्यक्रम आयोजित केला जिथं रजनीकांतनं परफॉर्म केलं होतं. तिथं के बालाचंद्रण प्रमुख पाहुणे होते. त्यांनी कार्यक्रमानंतर रजनीजवळ येत त्याला तामिळ शिकायला सांगितलं. रजनीनं ज्यावेळी मला ही गोष्ट सांगितली त्यावेळी 'तू चिंता करु नकोस. आतापासून तू माझ्याशी फक्त तामीळमध्येच बोलायचं. त्यानंतर जे काही झालं ते तुमच्यासमोर आहे'.
रजनीकांत यांनी देखील अनेकदा सांगितलं आहे की, राज बहादुर 400 रुपए महिन्याकाठी कमवायचे आणि प्रत्येक महिन्यात 200 रुपए मला पाठवायचे. त्यावेळी मी अॅक्टिंग स्कूलमध्ये होतो. दोन तीन वर्ष राज बहादूर यांच्या अर्ध्या पगारावर निघाले, असंही ते सांगतात.