Mumbai Crime : मुंबईतील सिप्झ परिसरातील बुलेट चोराला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. एमआयडीसी परिसरात राहणारा अब्दुल कादर सलीम मुंबईत वाहन पार्किंगची मोठी समस्या आहे. याचाच गैरफायदा घेत या चोरट्याने पार्क केलेल्या चक्क सहा बुलेट चोरी करून विकल्या. त्याची ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली.एम आय डी सी पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली.


मुंबईत कोरोना काळात खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी परवानगी नव्हती. त्यामुळे अनेकजण आपल्या खाजगी गाड्या घेऊनच कामावर जात होते. मात्र अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरात असलेल्या सिप्झ कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सिप्झ कंपनीच्या आतमध्ये पार्किंगला जागा नव्हती. त्यामुळे सर्व कर्मचारी सिप्झ कंपनी समोर असलेल्या रस्त्यावर आपल्या दुचाकी गाड्या पार्किंग कराव्या लागत असत. या पार्किंगमधूनच एमआयडीसी परिसरात राहणारा अब्दुल कादर सलीम, वय चाळीस वर्ष हा सराईत चोरटा बुलेट चोरी करत होता. त्याची ही चोरी तिसरा डोळा असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली. त्यानंतर यासंदर्भात तक्रार दिली, त्यावरून एमआयडीसी पोलिसांनी तपास केला आणि आरोपीला अटक केली.




एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक बाबींचा तपास करून या सराईत चोरट्याला अमरावतीमधून अटक केली आहे. हा चोरटा मुंबईमधून चोरी केलेल्या बुलेट मोटारसायकल थेट विदर्भातील अमरावतीमध्ये नेऊन विकायचा. लोकांनी बँकेचे हप्ते न भरल्यानं ओढून आणलेली गाडी असल्याचं सांगून विकत होता. मात्र या चोरट्याकडून एमआयडीसी पोलिसांनी 6 पेक्षा जास्त बुलेट बाईक रिकव्हर केल्या आहेत. या आरोपीनं मुंबईच्या आणखी कुठल्या भागांमध्ये अशा पद्धतीची चोरी केली आहे का? तसेच, या चोरीमध्ये त्याचे आणखी काही साथीदार आहेत का? याची सखोल चौकशी एमआयडिसी पोलीस करत आहेत.


तुमची कोणाची बुलेट किंवा मोटारसायकल असेल तर एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधा. तसेच ज्यांनी या चोरट्याकडून अशा मोटारसायकल विकत घेतल्या असतील आणि पुढील कायदेशीर कारवाई टाळायची असेल तर स्वतः हुन पोलिसांना माहिती द्या. नाहीतर त्यांची ऐन दिवाळीत जेलची हवा खावी लागू शकेल.