Rajinikanth Lal Salaam : "माझे वडिल 'संघी' नाहीत. ते 'संघी' असते तर 'लाल सलाम' हा सिनेमा केला नसता", असे दाक्षिणात्य अभिनेता आणि सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी म्हणाली. लाल सलाम (Lal Salaam) या सिनेमाचा ऑडीओ लाँच इव्हेंट पार पडला होता. या इव्हेंटसाठी रजनीकांत आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या देखील उपस्थित होती. यावेळी रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या (Aishwarya) वडिलांच्या समर्थनार्थ बोलताना दिसली. चेन्नईमध्ये 26 जानेवारी रोजी पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये ऐश्वर्याने (Aishwarya) तिच्या वडिलांना सोशल मीडियावर संघी म्हटले जात असल्याचे म्हटले. जेव्हा ऐश्वर्याने व्यासपीठावर सिनेमाबाबत आपली मते व्यक्त केली, तेव्हा रजनीकांत यांना अश्रू अनावर झाले होते.
चेन्नईमध्ये 26 जानेवारी रोजी लाल सलाम या सिनेमाचा ऑडिओ लाँच झाला. साईराम इंस्टिट्यूटमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्वांना संबोधित करताना रजनीकांत यांनी लाल सलामच्या टीमचे आभार देखील मानले. या इव्हेंट दरम्यान, रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हीने आपले मनोगत व्यक्त केले. तिने वडिलांवर होणाऱ्या व्यक्तिगत टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. वडिल रजनीकांत यांच्या समर्थनार्थ मुलगी ऐश्वर्या हिने भाष्य केले आहे.
काय म्हणाली रजनीकांत यांची मुलगी?
रजनीकांत यांची मुलगी यावेळी बोलताना म्हणाली, "मी सोशल मीडियावर सक्रिय नसते. मात्र, सोशल मीडियावर काय सुरु आहे? याबाबत माझी टीम मला नेहमी सांगत असते. मला सोशल मीडियावरील पोस्टही दाखवल्या जातात. माझ्या वडिलांबाबतच्या पोस्ट पाहून मला फार राग येत होता. आम्हीही माणूस आहोत. काही दिवसांपासून अनेक लोक माझ्या वडिलांना कॉल करतात आणि म्हणतात की, ते एक संघी आहेत. मलाही या शब्दाचा अर्थ माहिती नव्हता. मी काही लोकांना याबाबत विचारले की, संघी म्हणजे काय? तेव्हा मला सांगण्यात आले की, जे लोक एका विशिष्ट राजकीय पक्षाचे समर्थन करतात. तेव्हा त्यांना संघी म्हटले जाते."
पुढे बोलताना ऐश्वर्या म्हणाली, "मी स्पष्ट करु इच्छिते की, माझे वडिल संघी नाहीत. ते संघी असते, तर त्यांनी लाल सलाम सारखा सिनेमा केला नसता." मुलगी आपल्यासाठी व्यक्त होत असल्याचे पाहून रजनीकांत यांनाही अश्रू अनावर झाले. मुलगी ऐश्वर्याचे भाषण ऐकल्यानंतर रजनीकांत खुश झाले. ऐश्वर्याने यावेळी बोलताना काही खुलासेही केले आहेत. पुढे ती म्हणाली, सुरुवातीला हा सिनेमा बनवताना बऱ्याच अडचणी आल्या. कारण निर्माते या सिनेमा बनवण्यासाठी पुढे येत नव्हते.
लाल सलाम सिनेमा कसा आहे?
रजनीकांत यांचा आगामी लाल सलाम हा सिनेमा स्पोर्ट्सशी निगडीत आहे. यामध्ये अभिनेते रजनीकांत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय विष्णू विशाल आणि विक्रांतही सिनेमात झळकणार आहेत. लाल सलाम हा सिनेमा रजनीकांत यांच मुलगी ऐश्वर्या यांनी दिग्दर्शित केला आहे. लाइका प्रोडक्शनच्या सुबास्करन अल्लिराजाह हे या सिनेमाचे निर्माते आहेत. हा सिनेमा 9 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या