Maratha Reservation : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) केलेल्या सर्व मागण्या मान्य करत, आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. दरम्यान, 'आरक्षणा'च्या घोषणेनंतर मराठ्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. नवी मुंबईच्या (Mumbai) वाशीमध्ये थांबलेल्या मराठा आंदोलकांकडून पहाटेपासूनच जल्लोष केला जात आहे. डीजेच्या तालावर नाचत मराठा आंदोलक आनंद साजरा करतांना पाहायला मिळत आहे. 


'आरक्षणा'च्या घोषणेनंतर आज सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी नवी मुंबई या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित विजयी सभा पार पडणार आहे. यावेळी जरांगे यांच्या जंगी स्वागत केले जाणर आहे. विशेष म्हणजे यासाठी मोठ्याप्रमाणात गुलाल देखील आणण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजाच्या मागणीला मोठं यश आले आहेत. त्यामुळे आज राज्यभरात मराठ्यांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.


जेसीबीतून पुष्पवृष्टी होणार...


मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला मोठं यश मिळाल्याने मराठा समाजाच्या वतीने जल्लोष केला जात आहे. विशेष म्हणजे, वाशी येथे सभेच्या ठिकाणी सात ते आठ जेसीबी लावण्यात आले असून, या जेसीबीच्या माध्यमातून मनोज जरांगे यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. विशेष म्हणजे आणखी काही जेसीबी या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाशीत आज सर्वत्र जल्लोषाचा वातावरण पाहायला मिळत आहे. 


वाशीत भगवं वादळ...


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेली मनोज जरांगे यांची पायी दिंडी शुक्रवारी वाशीत दाखल झाली. यावेळी लाखोच्या संख्यने आंदोलक वाशीत दाखल झाले. त्यामुळे परिसरात सर्वत्र भगवं वादळ पाहायला मिळाले. मराठवाड्यासह राज्यातील सर्वच भागातील मराठे या पायी दिंडीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नजर जाईल तिकडे फक्त मराठा आंदोलक पाहायला मिळत होते. विशेष या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एपीएमसी मार्केट देखील बंद करण्यात आले आहेत. 


लोणावळ्यात गुलालाची उधळण...


मनोज जरांगेंनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. याचा आनंद आता गावागावात साजरा व्हायला लागलाय. पुण्यातील लोणावळ्यात जिथं मुंबईत दाखल होण्यापूर्वी विराट सभा झाली होती, तिथं ही मराठा बांधवांनी मोठा जल्लोष सुरू केलाय. गुलालाची उधळण करत, डीजेच्या तालावर जरांगे समर्थकांनी ठेका धरलाय. गाणी, मात्र जरांगेंवर आधारितचं वाजत आहे. यावेळी मराठा आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! मनोज जरांगेंनी 'मराठा आरक्षणा'ची लढाई जिंकली; रात्री नेमकं काय घडलं?