Raudra Marathi Movie : प्रत्येक गावाचा इतिहास असतो तसा माणसांचाही इतिहास असतो. या इतिहासाच्या गर्भात अनेक रहस्य दडलेली असतात. अशाच एका रहस्याचा शोध घेत असताना विविध भावभावनांचा खेळ रंगत जातो आणि त्यातून त्या रहस्याचं एक वेगळंच ‘रौद्र’ रूप समोर येतं. हे रूप नेमकं कोणाचं असणार? याची रंजक तेवढीच अकल्पित कथा म्हणजे ‘रौद्र’ हा मराठी चित्रपट. एम.जी पिक्चर्स निर्मित आणि रविंद्र शिवाजी लिखित-दिग्दर्शित ‘रौद्र’ हा चित्रपट 1 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’.कंपनीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.
काय आहे कथानक?
वडगांव... एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं गाव....1970 सालचा काळ.... त्रिंबक कुरणे नामक जनगणना अधिकारी जनगणनेच्या निमित्ताने वडगांवला येतो. त्रिंबकला इतिहासात रुची असते. नानासाहेब कुलकर्णीं हे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती. ते त्रिंबकची राहण्याची सोय त्यांच्या जुन्या वाड्यावर करतात. त्या वाड्याबद्धल चिक्कार अफवा असतात. वाडाही भव्य व भयानक असा असतो. काहीं दिवसात त्रिंबकला विचित्र व भयावह आवाज ऐकू येतात. नानासाहेबांकडे एक पुरातन बखर आहे ज्यात गावाबद्दल ऐतिहासिक माहिती आहे हे त्रिंबकला समजते. या बखरीतवेगवेगळी कोडी असतात ज्यामार्फत रहस्याचा उलगडा होणार असतो.
नायिकेच्या मदतीने कोडयामधील महत्त्वाचा धागा त्याचा हाती लागतो. मात्र या शोधाला अचानक विश्वासघाताचं ग्रहण लागतं, तेव्हा होणारा विनाश आणि त्याचं ‘रौद्र’ रूप या चक्रात कोण आणि कसं अडकणार? हे पहाणं अतिशय औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे. या साऱ्याला एका अलवार प्रेमाच्या गोष्टीची अनवट किनारही लाभली आहे.
नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला
राहुल पाटील आणि उर्मिला जगताप ही नवी फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. त्यांच्यासोबत दीपक दामले, अनिता कोकणे, अमित पडवणकर, ईशान गटकळ आदि कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची कथा मंगेश बाळासाहेब गटकळ यांची असून, पटकथा आणि संवाद रविंद्र शिवाजी यांचे आहेत. मंगेश बाळासाहेब गटकळ या चित्रपटाचे निर्माते तर सहनिर्माते समीर किसन गाडे आहेत. हर्षद गोलेसर, वैष्णवी अडोदे, शुभांगी केदार, शिरीष पवार या गायकांनी यातील गाणी गायली आहेत. संगीताची जबाबदारी अक्षय जाधव यांनी सांभाळली आहे. छायांकन स्वप्निल केदारे आणि संकलन आकाश मोरे यांचे आहे.
हेही वाचा :
- Mahesh Manjrekar : ‘पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नका’, महेश मांजरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा!
- Gangubai Kathaiwadi Collection Day 4 : बॉक्स ऑफिसवर ‘गंगुबाई काठियावाडी’ची जादू, चौथ्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!
- Mazhi Tuzhi Reshimgath : नेहाच्या आयुष्यात यशच्या रूपाने प्रेम येणार! परी करणार का नव्या नात्यांचा स्वीकार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha