Pushkar Shotri on Chinmay Mandlekar : मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यानंतर अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) बराच ट्रोल झाला आहे. त्यानंतर त्याने महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला. यावर अनेक कलाकार मंडळींनी त्याला पाठिंबा देत त्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. आता यावर अभिनेता पुष्कर श्रोत्रीची (Pushkar Shotri) देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.   

  


चिन्मयने त्याच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यानंतर अनेकांनी त्याला अश्लील भाषेत ट्रोल करणं सुरु केलं. त्यातच महाराजांची भूमिका साकारता आणि मुलाचं नाव जहांगीर ठेवता असं या ट्रोलर्सचं म्हणणं होतं. त्यावर चिन्मयची बायको म्हणजेच नेहा जोशी मांडलेकर हीने एक व्हिडिओ करत या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. त्यानंतर चिन्मयने व्हिडिओ शेअर करत आता ही भूमिका करणार नसल्याचा निर्णय घेतला.  


म्हणून वेगळे संस्कार करतोय का? - पुष्कर श्रोत्री


पुष्करने माध्यमांशी संवाद साधताना या सगळ्यावर भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, त्याने मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून वेगळे संस्कार करतोय का? तो भारतीय संस्कारच त्याच्यावर करतोय. आजची परिस्थिती कशी आहे याचा सगळा विचार करूनच तो त्याचं संगोपन करतोय. त्याला वाईट गोष्टीपासून परावृत्त करतोय, त्याला चांगल्याच गोष्टी शिकवतोय. मग, नावाने काय फरक पडतो? तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या मुलाच्या नावावरून त्याला ट्रोल करणार असाल, तर तुम्हाला इतिहास माहितीये का? ‘जहांगीर’ हे नाव का ठेवलं हे त्याने फार आधीच सांगितलेलं आहे. तुम्ही इतिहास चाचपडून बघा आणि तुमच्यामध्ये खरंच हिंमत असेल, तर तुमचा खरा चेहरा घेऊन समोर या. तुम्ही खोटी नावं, खोटी अकाऊंट्स बनवून ट्रोल करणार…तुम्हाला आम्ही किती महत्त्व द्यायचं? असे सवाल उपस्थित करत पुष्करने त्याचं परखड मत मांडलं आहे. 


चिन्मयच्या ट्रोलिंगवर कलाकारांच्या प्रतिक्रिया


अभिनेत्री गौतमी देशपांडे, दिग्दर्शक सुहृद गोडबोले, अभिनेता अक्षय वाघमारे, दिग्दर्शक समीर विद्वंस, सिद्धार्थ चांदेकर यांनी संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. चिन्मयने शेअर केलेला व्हिडिओ रिशेअर करत या कलाकार मंडळींनी चिन्मयसाठी पाठिंबा दर्शवला आहे. सध्या सोशल मीडियावर चिन्मयच्या या व्हिडिओची बरीच चर्चा आहे.     


ही बातमी वाचा : 


CM Shinde on Kangana Ranaut : कंगनावर झालेल्या 'त्या' कारवाईचा मुख्यमंत्री शिंदेंकडून उल्लेख, नेमकं काय म्हणाले?