Prajkta Gaikwad : झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajkta Gaikwad) हिने येसूबाईंची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या देखील चांगलीच पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. आता प्राजक्ता ही मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राजक्ताचा 'गुगल आई' हा सिनेमा लवकरच भेटीला येईल. शोध... भीती... काळजी... वेदना... अशा भावनांच्या विविध छटा उलगडणाऱ्या 'गूगल आई'चा रोमांचक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.
विविध भावनिक छटा उलगडणारा 'गूगल आई' चित्रपटाचा रंजक, रोमांचक ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत 'गूगल आई' या चित्रपटाचे डॉलर दिवाकर रेड्डी निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन गोविंद वराह यांचे आहे. तर ‘गूगल आय’ला एस सागर यांचे संगीत लाभले आहे.
सिनेमात हे कलाकार दिसणार
या सिनेमात प्रणव रावराणे, प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. हा सिनेमा येत्या 26 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलरमध्ये काय?
सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक हसतेखेळते, आनंदी कुटुंब दिसत असून अचानक त्यांच्या या सुखी कुटुंबात एक वादळ येते. या वादळात संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाल्याचे दिसत आहे. आता त्यांच्या आयुष्यात हे वादळ कसे आले, त्यातून ते बाहेर पडणार का? यात 'गूगल आई'ची कशी मदत होणार, या सगळ्या प्रश्नांची प्रेक्षकांना चित्रपट पाहून मिळणार आहेत. दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथच्या दिग्दर्शकांनी केल्यामुळे यात साऊथचा तडकाही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे 'गूगल आई'च्या निमित्ताने मराठी चित्रपट एका वेगळ्या वळणावर गेल्याचे चित्र आहे.