मुंबई : विशालगडावरील वादाला जातीय रंग मिळाला असून संभाजीराजे छत्रपतींच्या भूमिकेवरही काहींनी संशय घेत प्रश्न उपस्थित केले आहेत. संभाजीराजेंच्या (Sambhajiraje) नेतृत्वात विशाळगडवरील अतिक्रमण हटविण्यासाठी त्यांचे समर्थक आक्रमक झाल होते. त्यातूनच, विशाळगडावरील (Vishalgad) मशिदीवर चढून तोडफोड आणि काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली. या घटनेनंतर कोल्हापूर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्वत: शाहू महाराजांनी पत्रक काढून अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. दुसरीकडे पोलिसांनी संभाजीराजेंसह 18 जणांविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. आता, याप्रकरणी माजी मंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी मुंबईतील डीजी ऑफिसमध्ये जाऊन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी विद्यमान महायुती सरकावर हल्लाबोल केला.
अस्लम शेख यांनी आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन विशाळगडावरील हिंसाचावरुन कारवाईची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्याचे दुर्भाग्य की, आपल्या राज्यात हिंसाचार होतोय, विशेष म्हणजे महाराजांच्या नावाने हे होतंय. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. ज्यांनी महाराजांच्या नावाने पोलिसांवर हल्ला केला हे सुरक्षा यंत्रणांचे फेल्युअर असल्याचं अस्लम शेख यांनी म्हटलं. ज्यांना रोखायला हवे होते त्यांना, पोलिसांनी का रोखले नाही, असा सवाल उपस्थित करत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणीही अस्लम शेख यांनी केली आहे. अतिक्रमण हटवताना पुरेशी यंत्रणा असायला हवी, मात्र कुठलीही यंत्रणा न वापरल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
महायुती सरकावर हल्लाबोल
एक निवडणूक हारले म्हणून हे अशांततेच वातावरण तयार केलं जातं आहे. महिला-बालक पोलिस कर्मचारी यांनादेखील विशाळगडावार मारहाण केली जाते, हे निंदनीय असल्याचे म्हणत शेख यांनी महायुती सरकारवरही हल्लाबोल केला. तसेच, जनतेच्या मनात असुरक्षितता आहे. आम्ही रश्मी शुक्ला यांची भेट घेतली ही घटना अशोभनीय आणि दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलं. याप्रकरणी, आत्तापर्यंत 18 लोकांना ताब्यात घेण्यात आले असून इतरांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी असे प्रकार घडत असल्यास जनतेसमोर कारवाईतून उत्तर दिले पाहिजे. मात्र, समाजांतील तेढ वाढवण्यासाठी विष पसरविण्याचे काम काही लोक करताय, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.