मुंबई : लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानी प्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात गैरहजर राहीली. त्यामुळे आता 20 सप्टेंबरला होणा-या पुढील सुनावणीत कंगना कोर्टापुढे हजर झाली नाही तर तिच्यानावे अटक वॉरंट जारी केला जाईल, अशी तंबी दंडाधिकारी न्यायालयाने कंगनाला दिली आहे. या खटल्याविरोधात कंगनानं दाखल केलेली याचिका नुकतीत मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. तसेच दंडाधिकारी न्यायालयाची कारवाई योग्य असल्याचा निर्वाळाही दिलेला आहे. त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीत कंगनाला दंडाधिकारी न्यायालयात हजर रहाणं बंधनकारक होतं. या सुनावणीला जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी आणि जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनीही न्यायालयात हजेरी लावली होती.


Tejas Shooting : कंगना रनौत आता मिशन 'तेजस' वर, पायलटच्या गणवेशातील फोटो शेअर चाहत्यांना दिली माहिती


यावेळी कंगनाच्यावतीनं अ‍ॅड. रिजवान सिद्दीकी यांनी कंगनाला कोविड 19 ची लक्षणं दिसत असल्यानं तिला कोर्टापुढे हजर रहाण्यास काही दिवसाची मुदत द्यावी अशी विनंती न्यायालयाला केली. डॉक्टरांच्या अहवालासह तसा अर्जही कोर्टात सादर केला गेला. या कालावधीत कंगनाची प्रकृती ही सुधारेल आणि ती कोविड टेस्टही करेल असंही अ‍ॅड. सिद्दीकी यांनी न्यायालयाला सांगितलं. मात्र याला अख्तर यांच्या वकीलांनी जोरदार आक्षेप घेतला. केवळ सुनावणीला गैरहजर रहाण्यासाठीच कंगनाचा हा बहाना आहे. प्रत्येक वेळी सबब सांगून ती न्यायालयात हजर रहाण्याचे टाळतेय असा आरोपही त्यांनी केला. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत खटल्याची सुनावणी तूर्तास 20 सप्टेंबरपर्यंत तहकूब ठेवली. मात्र पुढील वेळी जर कंगना गैरहजर राहिली तर तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले जाईल अशी तंबीही न्यायालयाने दिली आहे.


कंगनाला दिलासा नाहीच, कॉपीराईटचा गुन्हा आणि पासपोर्ट नूतनीकरणासाठी कंगनाची हायकोर्टात याचिका


अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने रिपब्लिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका बॉलिवूड सुपरस्टार सोबतच्या तिच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधानं केली होती. मात्र, या संवेदनशील प्रकरणात आपला काहीही संबंध नसताना खोटे आणि आधारहीन आरोप कंगनानं आपल्यावर केले आहेत. यामुळे आपली विनाकारण बदनामी झाली असून आपल्याला प्रचंड मनस्ताप झाला आहे. त्यामुळे कंगनावर मानहानीचा फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे केली आहे. याप्रकरणी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं कंगना रणौतला यापूर्वीच जामीन मंजूर केला आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहात या प्रकरणी बजावण्यात आलेला वॉरंट रद्द करून घेतला होता. मात्र त्यानंतरही कंगना सातत्यानं गैरहजर राहील्यानं न्यायालयानं पुन्हा अटक वॉरंट जारी करणारण्याची तंबी दिली होती.