मुंबई : पुढील 2 दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात परवापासून पावसाचा जोर कमी होणार असून विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर कोकणात प्रमुख्याने पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. त्यामुळे पालघरसाठी प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मागील आठवड्यातच मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे.


विदर्भासाठी सर्वत्र आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोलीत मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोलीला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातही मुसळधार कोसळू शकतो. प्रामुख्याने नाशिकमधील घाट माथ्यावर मुसळधार पावसाच्या सरींचा अंदाज आहे. इकडे पुणे, सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, जळगावसाठी यलो अलर्ट तर नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.


सलग दुसऱ्या दिवशीही पालघर जिल्ह्यात संततधार 
सलग दुसऱ्या दिवशीही पालघर जिल्ह्यात संततधार सुरु असल्याने जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत असून धरणक्षेत्रांत चांगला पाऊस झाल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या धरणांची पाणी क्षमता शंभर टक्के पूर्ण झाली आहे. या दोन्ही धरणांत मिळून जवळपास 17 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सूर्या नदीत सुरू आहे. त्याच्यामुळे सूर्या नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच धामणी धरणातून जिल्ह्यातील औद्योगिक कार्यक्षेत्र त्याप्रमाणे प्रमुख शहर तसेच वसई विरार महानगरपालिका आणि शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. धरण फुल्ल झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचाही प्रश्न सुटला आहे.


भंडारदरा पाठोपाठ निळवंडे धरण ओव्हर फ्लो 
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा पाठोपाठ निळवंडे धरण ओव्हर फ्लो झाले असून निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात 20 हजार क्यूसेक वेगानं विसर्ग सोडण्यात आला आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन्ही धरणं भरल्यानंतर काल संध्याकाळपासून प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात आलाय. काल रात्री 30 हजार क्यूसेक वेगानं सुरू असणारा विसर्ग सकाळी 20 हजार क्यूसेकवर आला असून प्रवरा नदी दुधडी भरून वाहू लागली आहे. प्रवरा नदी पात्रालगत असणाऱ्या अनेक कुटुंबांना स्थलांतरित केले असून नदीवर असणारे छोटे पूल वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.