Phir aayi haseen Dillruba Review : खिळवून ठेवणाऱ्या कथेला दमदार अभिनयाची जोड; कसा आहे 'फिर आयी हसीन दिलरुबा'?
Phir aayi haseen Dillruba Review : 'फिर आयी हसीन दिलरुबा' हा 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या पहिल्या भागाचा सीक्वल आहे. त्यामुळे तुम्ही हा पहिला भाग पाहिला नसेल तर हा चित्रपट समजण्यास अडचणी येऊ शकतात
Phir Aayi Haseen Dillruba Review : 'ना चलन से ना चाल से, आशिक को पहचानो उसके दिल के हाल से', हा डायलॉग आहे, नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'फिर आयी हसीन दिलरुबा' (Phir aayi haseen Dillruba) या चित्रपटातील. 2021 मध्ये रिलीज झालेल्या 'हसीन दिलरुबा' या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. 'हसीन दिलरुबा' या चित्रपटातील गोष्ट 'फिर आयी हसीन दिलरुबा' हा चित्रपटात पुढे सरकते. नवी व्यक्तीरेखांसह दिनेश पंडित यांची कथा 'फिर आयी हसीन दिलरुबा'मध्ये पुढे सरकते, पण प्रेक्षकांना खिळवून ठेवते का?
चित्रपटाची गोष्ट काय?
'फिर आयी हसीन दिलरुबा' हा 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या पहिल्या भागाचा सीक्वल आहे. त्यामुळे तुम्ही हा पहिला भाग पाहिला नसेल तर हा चित्रपट समजण्यास अडचणी येऊ शकतात. यावेळी आग्रामध्ये ऋषू आणि राणीची कथा पुढे सरकताना दिसत आहे. चित्रपटात अनेक नवीन पात्र जोडले गेले आहेत जे चांगले ट्विस्ट आणतात. राणीच्या आयुष्यात आणखी एका पुरुषाची एन्ट्री झाली आहे. हा परपुरुष तिच्या प्रेमात बुडाला आहे. पण राणी रिशूवरचे तिचे प्रेम सुरू ठेवणार की या नव्या प्रेमाच्या प्रेमात पडणार हे पाहणे खूपच मनोरंजक आहे. चित्रपटाच्या कथेत प्रेमाचा आणि रक्तांचा लाल रंग आणखीच गडद होताना दिसला आहे.
कसा आहे चित्रपट?
तापसी पन्नूच्या या सिक्वेलने दाखवून दिले आहे की चित्रपटांचे सिक्वेल नेहमीच वाईट असतात असे नाही. कथेचा आणखी विस्तार करता येईल आणि ते इथे घडले आहे. काही ठिकाणी हा चित्रपट काहीसा संथ झाला आहे, असे वाटू शकते. पण, चित्रपटातील ट्विस्ट तुम्हाला खिळवून ठेवते. 'हसीन दिलरुबा' आणि 'फिर आयी हसीन दिलरुबा' मधील राणी ही दिनेश पंडित यांच्या पुस्तकांची चाहती आहे. हे तिच्या संवादातून दिसून येते. तिच्या तोंडी असलेला "पंडित जी कहते है..." हा डायलॉग वारंवार येतो. त्यामुळे तुम्हाला कंटाळवाणे वाटू शकते. मागील चित्रपटाच्या तुलनेत या चित्रपटात कमी इंटीमेट सीन्स पाहायला मिळाले आहेत. या चित्रपटाचा पुढील भाग येऊ शकतो, अशा कथानकावर चित्रपट संपवला आहे. या चित्रपटातील किशोर कुमारच्या आवाजात वाजवलेले 'एक हसीना थी' हे गाणे चित्रपटातील सर्वोत्तम भागांपैकी एक आहे.
या चित्रपटाच्या दोन्ही भागांवरून एक लक्षात येते की, चित्रपटाच्या निर्मात्यांना आपल्या कथेवर आधारीत असलेल्या चित्रपटांचा एक प्रेक्षक वर्ग तयार करायचा आहे. हसीन दिलरुबा ही एक चित्रपटांची सीरिज होऊ शकेल.
कलाकारांचा अभिनय कसा आहे?
'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपटात तापसी पन्नू, विक्रांत मेस्सी यांची मुख्य भूमिका आहेच. त्याशिवाय आता नवीन व्यक्तीरेखाही जोडल्या गेल्या आहेत. सनी कौशल, जिम्मी शेरगिल आणि भूमिका दुबे यांच्याही भूमिका आहेत. सगळ्याच कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. चित्रपटाची जसजशी कथा पुढे सरकते, तसतशी व्यक्तीरेखा आणखीच खुलतात. सनी कौशलने चांगले काम केले आहे. त्याने आपल्या व्यक्तीरेखेला न्याय दिला आहे. जिमी शेरगिल पोलिसाच्या भूमिकेत दिसला आहे. पहिल्या भागात हत्या झालेल्या नीलचा जवळचा नातेवाईक दाखवला आहे. चित्रपटाच्या या भागातही तापसी आणि विक्रांतने दमदार भूमिका केली आहे.
दिग्दर्शन कसे आहे?
'फिर आयी हसीन दिलरुबा' या चित्रपटाचे दिग्दर्शन जयप्रद देसाई यांनी केले असून या चित्रपटाच्या लेखिका कनिका ढिल्लाँन आहेत. दिग्दर्शन आणि लेखन दोन्ही अप्रतिम आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथेचा प्रवाह पाहून, आपण पडद्यावर एखाद्या पुस्तकाची कथा पाहत असल्याचा भास होतो. जयप्रद देसाई यांनी दिनेश पंडित यांची कथा खऱ्या पात्रांमधून सांगण्याचे उत्तम काम केले आहे.