Ms Marvel Episode 4 : मार्वल स्टुडीओची पहिलीवहिली पाकिस्तानी मुस्लिम सुपर हिरो कमाला खान अर्थात ‘मिस मार्वल’ (Ms Marvel) चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. या सीरिजमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार झळकत आहेत. इतकंच नाही तर, बॉलिवूड गाण्यांनी या सीरिजची लज्जत आणखी वाढवली आहे. नुकताच या सीरिजचा चौथा एपिसोड रिलीज झाला आहे. ‘मिस मार्वल’ या सीरिजचा चौथा एपिसोड आणखी खास बनला आहे. हॉलिवूडच्या या सीरिजच्या चौथ्या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर झळकला आहे.
या सीरिजमध्ये फरहान अख्तरची अवघी 7 ते 10 मिनिटांची भूमिका आहे. मात्र, या भूमिकेतही त्याने जबरदस्त मनोरंजन केले आहे. या सीरिजमध्ये त्याने ‘वलिद’ नावाच्या एका योद्ध्याची भूमिका साकारली आहे. चला तर, जाणून घेऊया या एपिसोडमध्ये नेमकं काय घडतं...
कमाला खानची पाकिस्तानात एन्ट्री!
या सीरिजचे मुख्य पात्र अर्थात कमाला खान ही आतापर्यत अमेरिकेत राहत होती. मात्र, आता तिच्या आजीने तिला पाकिस्तानात भेटायला बोलावले आहे. यासाठी कामाला आणि तिची आई पाकिस्तानला रवाना झाल्या आहेत. कमाला पहिल्यांदाच पाकिस्तानला जात आहे. कमालाकडे असलेल्या सुपरपॉवर देणाऱ्या कड्याचं रहस्य तिला याच ठिकाणी उलगडणार आहे. ही कथा देखील सुरु झाली होती भारत-पाकिस्तान फाळणीवरून.. या फाळणीत कमालाचे पूर्वज आयेशा आणि तिचे पती पाकिस्तानमध्ये स्थायिक झाले होते.
मात्र, हे संपूर्ण कुटुंब मनुष्य नसून, जीन आहेत, जे दुसऱ्या जगातून या जगात येऊन अडकले आहेत. नुकताच या सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला आहे. कमालाच्या हातातील जादुई कड्यातून निघणारा नूर अर्थात प्रकाश त्यांना त्यांच्या जगात परत जाण्यासाठी मदत करणार आहे. या जगात आलेल्या जीनच्या देखील दोन टोळ्या बनल्या आहेत. यातील एक टोळी दुष्ट प्रवृत्तीची आहे तर, दुसरी जगाची मदत करणारी टोळी आहे. यापैकी दुष्ट प्रवृत्तीची टोळी कमालाला शोधून तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. परंतु, यातून बचावलेली कमाला कराचीला निघून जाते. इथे तिची भेट आणखी एका जीन टोळीसोबत होते. या टोळीचा प्रमुख आहे ‘वलिद’ अर्थात फरहान अख्तर!
वलिद कमालाला त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आणि त्यांचा उद्देश सांगतो. मात्र, त्याचवेळी दुष्ट टोळी त्यांच्यावर हल्ला करते. या हल्ल्यात कमाला आणि करीम यांना वाचवताना वलिदचा मृत्यू होतो. वलिदच्या मृत्यूनंतर कमालाच्या सुरक्षेची जबाबदारी करीमवर येते. यावेळी सीरिजमध्ये एक जबरदस्त अॅक्शन सिक्वेन्स पाहायला मिळतो. या मारामारी दरम्यान कामालाच्या हातातील कड्यावर अस्त्राचा वार होतो आणि ती अचानक भारत-पाक फाळणीच्या काळात रेल्वे स्टेशनवर येऊन पडते. आता ती इथे कशी आणि का आली, याची उत्तर तिला शोधायची आहेत. यासाठी ती देखील भारतातून कराचीला जाणाऱ्या शेवटच्या ट्रेनवर चढते. पुढे काय घडणार याची उत्सुकता लागली असतानाच हा एपिसोड संपतो. आता वालिदच्या मृत्यनंतर कमालाची सुरक्षा कोण करणार आणि त्या कड्याचं पुढे काय होणार हे पुढच्या भागात प्रेक्षकांना कळणार आहे.
या भागात प्रेक्षकांना अखेर कमाला खानची आजी पाहायला मिळाली आहे. सोबतच पाकिस्तानची झलक पाहायला मिळाली आहे. अर्थात या सीरिजचे शूटिंग पाकिस्तानात झालेले नाही. पाकिस्तान म्हणून जे काही दाखवण्यात आले आहे, त्याचा संपूर्ण सेट थायलंडमध्ये लावण्यात आला होता. मात्र, त्यातील बारकावे पाहून कथा पाकिस्तानातच घडत आहे, असे वाटते. प्रत्येकफ्रेममधून पाकिस्तानची झलक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जगभरातील कलाकारांची फौज
दर, बुधवारी डिस्नी प्लस हॉटस्टारवर या सीरिजमधील पुढचा भाग प्रदर्शित होतो. मार्वल युनिव्हर्समधली या सीरिजमध्ये अभिनेत्री इमान वेलानी मुख्य भूमिकेत झळकली आहे. तर, सागर शेख, अरामिस नाइट, मॅट लिंट्झ, झेनोबिया श्रॉफ आणि मोहन कपूर हे देखील महत्त्वाच्या भूमिका निभावताना दिसत आहेत.
हेही वाचा :
Ms. Marvel : ‘मिस मार्वल’चा ग्रँड प्रीमिअर, मार्वल सिरीजमध्ये बॉलिवूड अभिनेताही झळकणार!