Ms. Marvel Episode 1 Review : मार्वलचे चित्रपट म्हटले की, त्यातले भन्नाट व्हीएफक्स आणि सुपर पॉवर्स या गोष्टी लगेच डोळ्यांसमोर येतात. कॅप्टन अमेरिका, हल्क, ब्लॅक विडो, मून नाईट ते स्पायडर मॅन, बॅटमॅन पर्यंत सगळीच सुपरहिरोची पात्र प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरली. या पात्रांनी प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यश मिळवलं. आतापर्यंत या मार्वल सीरिजमधील बहुतांश पात्र ही अमेरिकन पार्श्वभूमी असणारी होती. मात्र, ‘मिस मार्वल’च्या (Ms. Marvel) रूपाने पहिल्यांदाच एक नवा प्रयोग करण्यात आला आहे.


मार्वलने या आधीही ‘लेडी सुपरहिरो’ प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. पण. ‘मिस मार्वल’ मात्र त्यात वेगळी ठरली आहे. सगळ्याच बाबतीत ‘मिस मार्वल’ वेगळी ठरण्याचं कारण आहे तिची कौटुंबिक पार्श्वभूमी. मार्वलच्या इतिहासात पहिल्यांदाच एक पाकिस्तानी मुस्लिम मुलीला सुपर हिरो म्हणून दाखवण्यात आले आहे आणि हेच या सीरिजचे वेगळेपण आहे. अनेकांना ही संकल्पना रुचलीये. तर, अनेकांनी यावर टीका देखील केली आहे. या बेव सीरिजचे तीन एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आज आपण पहिल्या एपिसोडमध्ये नेमकं काय आहे? तो कसा वाटला?, ते जाणून घेणार आहोत.


काय आहे कथानक?


आता ही सीरिज मार्वलची असली तर, टिपिकल मार्वलप्रमाणे यात थेट अमेरिक संस्कृती न दाखवता आधी भारताचा उल्लेख येतो. भारत पाकिस्तान फाळणीची पार्श्वभूमी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अर्थात ही कथा अमेरिकेतच घडत असली तरी, तिचे भारताशी आणि पाकिस्तानशी खास कनेक्शन आहे. हि कथा आहे खान कुटुंबाची. युसुफ खान आपली पत्नी, मुलगा आणि एक मुलगी अशा चौकोनी कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. हे संपूर्ण कुटुंब अर्थात त्यांचे पूर्वज हे भारतात वास्तव्यास होते. मात्र, भारत पाकिस्तान फाळणी दरम्यान त्यांना पाकिस्तानात जावं लागलं.


पहिल्या एपिसोडची सुरुवात होते एका 16 वर्षीय मुलीच्या मार्वल कार्टून बनवण्याच्या व्हिडीओने. या मुलीचं नाव आहे कमाला खान. कमाला खान ही या सीरिजची नायिका आहे. तिचा स्वप्नांच्या दुनियेत जगत, मार्वलची पात्र कॉमिक स्वरुपात रंगवण्याचा छंद असतो. तिच्या आई-वडिलांना मात्र हे फारसं आवडत नाही. ती मुस्लिम असल्याने शाळेतही तिचे फारसे मित्र-मैत्रिणी नाहीत. मात्र, यात तिचा एक जिवाभावाचा मित्र आहे. त्याचं नाव आहे ब्रुनो. ब्रुनो कमालाला तिच्या प्रत्येक गोष्टीत साथ देतो.


आई-वडील नसलेला अमेरिकन ब्रुनो कमालासाठी काहीही करायला तयार असतो. अशातच एका मार्वल फॅनफेस्टची घोषणा होते. कमाला तिच्या आई वडिलांकडे तिथे जाण्याची परवानगी मागते. मात्र, ते तिला परवानगी नाकारतात. त्याचवेळी तिच्या आजीकडून अर्थात कराचीहून एक पार्सल येतं. ज्यात काही चेन आणि एक मोठा कडा असतो. मात्र, पुन्हा एकदा कमाला स्वप्नविश्वात रमेल, म्हणून तिची आई ते पार्सल तिच्याकडून काढून घेते. घरच्यांनी परवानगी नाकारली असली तरी, कमाला ब्रुनोच्या मदतीने फॅनफेस्टला जाण्याची योजना आखते. यासाठी ती स्वतः एक ‘मिस मार्वल’चा ड्रेस तयार करते. यावर शोभून दिसेल म्हणून ती तिच्या आईला कळू न देता आजीने पाठवलेला कडा घालते. मात्र, हा कडा घातल्यानंतर कमालाचं आयुष्यचं बदलून जातं.. आता पुढे काय होतं हे सीरिजमध्येच पाहणं अधिक उत्कंठावर्धक ठरेल.


का बघाल?


जर, तुम्ही टिपिकल मार्वल चित्रपटांचे फॅन असाल, तर कदाचित ही सीरिज सुरुवातीला थोडी खटकू शकते. यात बरेच कलाकार भारतीय आहे. इतकंच नाही तर, यात चक्क बॉलिवूड चित्रपटांची गाणी वापरण्यात आली आहेत. मात्र, मार्वलची वेगळी संकल्पना म्हणून ही सीरिज पाहताना मनोरंजन नक्कीच होतं. मार्वल फॅन असणाऱ्यांना ही सीरिज नक्कीच आवडेल. दर बुधवारी डिस्नी प्लस हॉटस्टारवर या सीरिजमधील पुढचा भाग प्रदर्शित होतो. मार्वल युनिव्हर्समधली या सीरिजमध्ये अभिनेत्री इमान वेलानी मुख्य भूमिकेत झळकली आहे. तर, सागर शेख, अरामिस नाइट, मॅट लिंट्झ, झेनोबिया श्रॉफ आणि मोहन कपूर हे देखील महत्त्वाच्या भूमिका निभावताना दिसत आहेत.


हेही वाचा :


Ms. Marvel : ‘मिस मार्वल’चा ग्रँड प्रीमिअर, मार्वल सिरीजमध्ये बॉलिवूड अभिनेताही झळकणार!