Bade Miyan Chote Miyan Review : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांचा 'बडे मियां छोटे मियां' (Bade Miyan Chote Miyan) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. दूध मागितलं तर खीर देऊ याप्रमाणे अपेक्षापेक्षा जास्त काही देऊन जाणारा हा चित्रपट ठरला आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar), टायगर श्रॉफ (Tiger Shroff), दाक्षिणात्य सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन (Prihviraj Sukumaran), विश्वसुंदरी मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) अशा सर्वांनीच अपेक्षेपेक्षा जास्त काम केलेलं पाहायला मिळत आहे. 'बडे मियां छोटे मियां' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. अक्षय आणि पृथ्वीराजचे चाहते या चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. 


'बडे मियां छोटे मियां'चं कथानक काय आहे? 


'बडे मियां छोटे मियां' हे हीरो आहेत. यात आर्मीतील टॉप सोल्जर आहेत. देशाला वाचवण्यासाठी ही मंडळी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. पृथ्वीराज सुकुमारन खलनायक आहे. देशाचे शत्रू कोण आहेत हे सिनेमा पाहताना कळेल. छोटा आणि मोठा कसा देशाला वाचवतो ही या चित्रपटाची गोष्ट आहे. पाकिस्तानला नेहमीप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आलेला नाही. चीनचीदेखील झलक या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दोन हीरो, दोन देश या व्यतिरिक्त या चित्रपटात जास्त काही दाखवण्यात आलेलं नाही.


कसा आहे 'बडे मिया छोटे मियां'? 


'बडे मिया छोटे मियां' हा ठीक ठाक चित्रपट आहे. खूप चांगला किंवा खूप वाईट असा हा चित्रपट नाही. एका अॅक्शन सीक्वेंसच्या माध्यमातून या चित्रपटाचं कथानक सुरू होतं. अॅक्शनचा तडका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अक्षय आणि टायगरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासारखी आहे. मानुषी छिल्लर अॅक्शन करताना चांगली वाटते. चित्रपटाचं चित्रीकरण खूपच भव्यदिव्य करण्यात आलं आहे. पण चित्रपट कथानकात थोडासा कमी पडला असं वाटतं. चित्रपटाच्या पोस्टवर, टीझरवरुनच याचं कथानक नक्की काय असेल याचा तुम्हाला अंदाज लावता येईल. अनेक संवाद वाईट दर्जाचे असल्याने हसू येतं. अक्षय, टायगर आणि पृथ्वीराजच्या चाहत्यांना हा सिनेमा नक्कीच आवडेल. तिघांना एकत्र अॅक्शन करताना पाहून प्रेक्षकांना मजा येईल. तिघांचाही हीरोपंती अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतो. एक मसालापट पाहण्याची तुमची इच्छा असेल तर हा चित्रपट नक्की पाहा.


अक्षय कुमार मोठ्या कालावधीनंतर अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचा अॅक्शन अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. टायगर श्रॉफला अॅक्शन करताना पासून मजा येत आहे. अॅक्शन मोड हा टायगरचा जॉनर असून त्याला अॅक्शन करायला आवडतं. अक्षय कुमारसोबत त्याची केमिस्ट्री चांगली वाटते. मानुषी छिल्लरने शानदार काम केलं आहे. मानुषीला अॅक्शन करताना पाहून मजा येते. पृथ्वीराज सुकुमारन, अलाया एफ, रोनित रॉय या सर्वांनीच आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.


'बडे मियां छोटे मियां' हा चित्रपट मसालापट आहे. हा चित्रपट पाहताना तुमचं डोक बाजुला ठेऊन जा. स्टार पावर आणि अॅक्शनमुळे या चित्रपटाला 3 स्टार देता येतील.