Ghalib Natak : मराठी रंगभूमीकडून गेली अनेक दशके नाट्यरसिकांची सेवा केली जातेय. प्रत्येक काळात रंगभूमीच्या शिलेदारांनी नाट्यरसिकांची सेवा केलीये. मागच्या काही काळामध्ये मराठी नाटक मागे तर नाही ना पडत अशी शंका होती. पण हा संभ्रम मराठी रंगभूमीवर आलेल्या काही नाटकांनी आताच्या काळात पार मोडीत काढलाय. अनेक आशयाची, नव्या पिढीच्या विषयांची, काळाला सुसंगत असणारी अनेक नाटकं सध्या रंगभूमीवर येतायत. सध्या असचं एक नाटक मराठी रंगभूमीवर आलंय. ते नाटक म्हणजे 'गालिब. शब्दांची किमया, नात्यांचा प्रवास, लेखकाचं जग अशा अनेक मुद्द्यांना हात घालत हा रंगभूमीवरचा गालिब जन्माला आलाय.
चिन्मय मांडेलकर लिखित आणि दिग्दर्शिक, गौतमी देशपांडे, विराजस कुलकर्णी, अश्विनी जोशी, गुरुराज अवधानी ही कलाकार मंडळी असलेलं हे नाटक सध्या रंगभूमीवर त्याची छाप सोडतंय. आताच्या काळात सुरु असलेल्या नाटकांपेक्षा पूर्णपणे वेगळा विषय मांडून त्यातून एका नवोदित लेखकाचा आणि नात्यांचा प्रवास या नाटकाने उलगडला आहे. खरंतर मिर्झा गालिब हल्लीच्या पिढीला कळणं तसं थोडं कठीण. पण त्याच गालिबच्या बळावर नात्यांची गोष्ट उलगडू शकते हे चिन्मय मांडलेकरच्या गालिबनं सांगितलंय. या गालिबविषयी सुरुवातीला फार कुतुहल निर्माण झालं होतं. त्यातच चिन्मय मांडेलकरचं लेखन आणि दिग्दर्शन त्यामुळे या गालिबकडून अपेक्षा फार रुंदावल्या होत्या. पण हे नाटक पाहिल्यानंतर त्या अपेक्षा पुर्णत्वास गेल्या अशाच भावना निर्माण होतात. बरं आता राहतो प्रश्न तर हा गालिब नेमका आहे तरी काय?
गालिब नाव सुरुवातील ऐकल्यावर असं वाटलं मिर्झा गालिबवरचं काही मराठी रंगभूमीवर येतंय म्हणजे काहीतरी नवीन असणार. पण त्या नाविन्याच्या कल्पना या आजच्या काळाशी सुसंगत असतील याची कल्पना नव्हती. गोष्ट सुरु होते ते इला किर्लोस्कर आणि मानव किर्लोस्कर या बाप लेकीच्या नात्यावरुन. मानव किर्लोस्कर पुण्यात राहणारे शिक्षक. लिखाणाच्या आवडीने एक दिवस नोकरी सोडून दारात उभे राहिले अन् त्यानंतर शब्दांच्या जगात स्वत:ला वाहून दिलं ते इतकं की अगदी या साहित्यकाच्या आयुष्यात 10 वर्षांचा वेडेपणाचा काळ आला. बरं बायकोनंही अर्ध्यावर साथ सोडली. हे पाहून अवघ्या 18 वर्षांची झालेल्या इलानं वडिलांसाठी शिक्षणही सोडलं. घराची जबाबदारी सांभाळणारी मोठी मुलगी रेवा मुंबईला आपलंस करुन पुण्यातल्या घर सांभाळते. पण घरापासून मात्र दुरावते.
यामध्ये प्रवास सुरु असतो तो गालिबचा. मानव किर्लोस्कर यांना गालिबवर कादंबरी लिहायची असते. आजारपणामुळे शब्द सोबत असतात पण पानावर लिहिताना मात्र हरवतात. यामध्ये 375 वह्या लिहून होतात, ज्यामध्ये कशाचा काही संबंध नसतो, पण लिहिण्याची नशा सुटत नाही. या गालिबच्या प्रवासात इलाही त्यांच्यासोबत असते. मानव किर्लोस्कर यांच्या जाण्यानंतर अंगद दळवी नावाचा त्यांचा शिष्य आणि प्रसिद्ध लेखक मानव किर्लोस्करांच्या घरी येऊन त्यांनी गालिबविषयी काहीतरी लिहून ठेवलंय का याची चाचपणी करतो पण हाती काहीच लागत नाही, इला शिवाय. या प्रवासात तो आणि इला जवळ येतात. त्यामध्ये इला अंगदच्या हातात गालिब देते. पण ते गालिब इलानेच लिहिलंय की मानव किर्लोस्करांनी या सगळ्या गोष्टींचा उलगडा पुढे नाटकात होतो.
पण हा प्रवास केवळ एका कांदबरीचा नाहीये. तर नात्यांचा देखील आहे. बहिणी-बहिणींचा, बाप-लेकींचा, गुरु-शिष्याचा अशी अनेक नाती त्यांच्या त्यांच्या मार्गाने प्रवास करत असतात. यामधून एक नवोदित लेखकही जन्माला येतो. तो लेखक कसा जन्म घेतो आणि त्याचा प्रवास कसा आहे हे देखील नाटकात अगदी सहजरित्या दाखवलंय. पण त्याचवेळी लेखकाच्या वाट्याला आलेल्या पांढऱ्याशुभ्र कागदाचे व्रणही यातून चिन्मयने अगदी सहजरित्या मांडले आहेत.
नाटकाचं नेपथ्यही तितकचं मजबूत आहे. घरात असणाऱ्या साध्या कारंज्याची सुद्धा नाटकात महत्त्वाची भूमिका आहे. अगदी सहज वाटावा अशी ही गोष्ट कलाकारांच्या अभिनयाने पूर्णत्वास गेलीये. अभिनेत्री गौतमी देशपांडे हीने इला किर्लोस्कर, विराजस कुलकर्णी याने अंगद दळवी, अश्विनी जोशी ही रेवा किर्लोकस्करच्या भूमिकेत आणि गुरुराज अवधानी यांनी मानव किर्लोस्कर यांची भूमिका आहे. गौतमी देशापांडेचं हे पहिलं व्यावसायिक नाटक. पण तिने तिच्या अभिनयाची शिकस्त केल्याचं पाहायला मिळतं. विराजसचा रंगभूमीवरचा वावर हा वाखडण्याजोगा आहे.
अष्टविनायक प्रकाशित मल्हार आणि वज्रेश्वरी यांची निर्मिती असलेलं हे नाटक आहे. संतोष शिदम, नेहा जोशी-मांडेलकर हे या नाटकाचे निर्माते आहे. नाटकाचं नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांनी केलंय. खरंतर अशी नाटकं रंगभूमीवर येण्यासाठी बराच काळ लोटावा लागतो, हे नाटक पाहिल्यानंतर तो लोटलाय असं वाटतं. त्यामुळे एका लेखकाचा आणि शब्दांसह नात्यांचा प्रवास पाहायचा असेल तर हे नाटक तुम्ही नक्की पाहू शकता.