Mira Velankar : प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं स्थान हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि गरजेचं असतं. मुलासाठी असणारं आईचं हळवं मन याची प्रत्येकालाच कल्पना आहे. खऱ्या आयुष्यात असो किंवा मालिकांमध्ये आई आणि मुलांमधील कोणताही हळवा क्षण पाहताना कोणाच्याही डोळ्यात आपसूकच पाणी येतं. असाच एक अनुभव एका मराठी अभिनेत्रीने (Marathi Actress) शेअर केला आहे.
येत्या 12 मे रोजी मातृदिन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने झी मराठी वाहिनीवरील शिवा या मालिकेत सिताईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मीरा वेलणकरने तिच्या आईपणाचा अनुभव सांगितला आहे. मालिकेच्या एका सीनदरम्यान मी विसरुनच गेले की भूमिकेत आहे, असं या अभिनेत्रीने सांगितलं. त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यातीलही आईपणाचा अनुभव या अभिनेत्रीने यावेळी शेअर केला आहे.
'तो सीन करताना माझ्या मनाची खूप चलबिचल झाली'
मीरा वेलणकरने सांगितलं की, शिवा मालिकेत मी आशुची आई आहे. त्यामध्ये त्याचं आणि माझं नातं खूपच प्रेमळ आहे. माझा मुलगा फक्त 12 वर्षांचाच आहे. शिवा' मालिकेच्या निम्मिताने मला कळेल की मला पुढे जाऊन कसं वागायला हवे आणि कसं नाही. यानिमित्ताने मालिकेच्या शुटींगदरम्यानचा एक किस्सा सांगते. कारण एकदा तुम्ही आई झालात की तुमच्यात एक प्रेमभावना असते, मग ते ऑनस्क्रीन मुलगा असो किंवा खरा मुलगा.त्यादिवशी आम्ही एक सीन करत होतो जिथे आशु रात्रभर घरी आलेला नसतो. आई म्हणून मी अत्यंत काळजीत असते मग अचानक तो घरी येतो मी त्याला पाहते आणि रडायलाच लागते. तेव्हा माझ्या मनात हे चालू होतं की खऱ्या आयुष्यात जर माझा मुलगा घरी आला नाही तर मी काय करेन. त्या विचाराने शॉट देता देता माझं डोळे पाणावले. तो सीन करताना माझ्या मनाची खूप चलबिचल झाली.
त्यावेळी मला समजलं संयम किती महत्त्वाचा आहे - मीरा वेलणकर
मीराने पुढे म्हटलं की, माझा मुलगा जन्माला आला तेव्हा सुरवातीचे काही दिवस माझ्या डोक्यात हाच विचार चालू असायचा की त्याने खाल्लं का, त्याची अंघोळ झाली का, त्याला आता भूक लागली असेल का? ह्या सर्वामध्ये मी हे विसरून जायचे की माझी विश्रांती झाली आहे की नाही. हे सगळं फक्त आईपण अनुभवल्यावरच होऊ शकत. कुठली ही गोष्ट असो ती अभ्यासपूर्व करायची अशी माझी पद्धत आहे म्हणून मी गरोदर असताना प्रेग्नन्सी, पोस्ट-प्रेग्नन्सी, मुलाचं संगोपन, मुलाचा विकास ह्या सगळ्याची खूप पुस्तक वाचली होती खूप माहिती होती पण जेव्हा मी खऱ्या अर्थानी आई झाले तेव्हा कळले की ती माहिती आहे, अनुभव नाही. माझा मुलगा खूप लाजाळू आणि अंतर्मुख होता त्याला शाळेत आणि लोकांशी रमायला वेळ लागायचा आणि ह्यामुळे मी तिथे असणं अपरिहार्य असायचं, मी कधी-कधी थकून जायचे त्यावेळी मला समजले की संयम किती महत्वाचं आहे
आईचेही मानले आभार
मातृदिनानिमित्तान मीराने तिच्या आईचे देखील आभार मानले आहेत. यावर तिने म्हटलं की, आई म्हणून माझ्या हे लक्षात आलं की माझ्या मुलाचा स्वभाव वेगळा आहे आणि मी ते स्वीकारले तेव्हा त्याच्यातला ही बदल मला दिसू लागला आता त्याच्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही की तो अंतर्मुख होता इतका उस्फुर्त मुलगा आहे. आम्ही तिघी बहिणी, माझी आई शिक्षिका होती आणि ती घर आणि काम दोनी सांभाळायची ती माझी हिरो आहे. मी तिला इतकच बोलू शकते खूप खूप धन्यवाद कारण ती जे करू शकली ती एक सुपरवुमनच करू शकते.