Amol Kolhe : मतदानाला अवघे तीन दिवस बाकी असताना राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी एक मोठी घोषणा केली. पुढील पाच वर्षांसाठी अभिनयातून ब्रेक घेत असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलं. पण आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांनी दुसरी घोषणा केली आहे. पाच वर्षांसाठी ब्रेक म्हणजे अमोल कोल्हे स्क्रिनवर दिसणार नाहीत, पण ते महानाट्य करणार आहेत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. म्हणजेच अमोल कोल्हे पुढील पाच वर्ष मालिकांना ब्रेक लावणार आहेत, पण महानाट्याच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येतील. याबाबत त्यांनी एबीपी माझासोबत बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन गटांतच मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे मैदानात आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आढळराव पाटील हे रिंगणात आहेत. त्यामुळे शिरुरमधील संघर्ष हा पणाला लागलाय. त्यातच उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध घोषणा देखील केल्या जातायत. त्यातच अमोल कोल्हेंनी मालिकेतून ब्रेक घेण्याची घोषणा केली होती.
अमोल कोल्हेंनी काय म्हटलं?
राज्यातील समीकरणं बदलली आहेत, अशात पक्ष अडचणीत आलाय. शिवाय शिरूर लोकसभेतील प्रलंबित कामं ही मार्गी लावायची आहेत. अशावेळी मला मालिका की राजकारण यातील एकचं पर्याय निवडावा लागणार होता. म्हणूनच मी पुढची पाच वर्षे मालिका विश्वातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. पण मी महानाट्य मात्र करत राहणार. असं शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हेनी जाहीर केलं.
गेल्या लोकसभेला ही कोल्हेनी अशीच घोषणा केली होती, नंतर मात्र त्यांनी मालिकांचे चित्रीकरण सुरू केलं होतं. मग मतदारांनी यावेळच्या घोषणेवर कसा विश्वास ठेवायचा? यावर बोलताना विरोधकांचा हा प्रचार खोटा आहे. असा दावा कोल्हेनी केला. मी फक्त महानाट्य करतो, यापुढं ही करेन. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे हा माझा श्वास आहे. हे महानाट्य नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान होतं, यासाठी मला काही तास खर्ची घालावे लागतात. त्यामुळं मालिका विश्वातून ब्रेक घेताना मी महानाट्य सुरुचं ठेवणार असल्याचं कोल्हेनी स्पष्ट केलं.