Mi Dhamapur Talav Boltoy : 'उरला -सुरला धामापूरच्या तळ्यात' ही तळकोकणातली प्रसिद्ध म्हण सर्वांनाच माहिती आहे. विपुल निसर्ग-संपदा आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या धामापूर तलावाने आजवर अनेक जीवांना आपल्या कुशीत आसरा दिला आहे आणि कित्येक शतकांपासून कोकणात मानाचा दर्जा मिळवला आहे. जुन्या-जाणत्या माणसांच्या बुद्धिमत्तेचे प्रतीक म्हणून आज धामापूर तलावाच्या रचनेकडे बघितले जाते. 2020मध्ये 'जागतिक वारसा सिंचन स्थळ' हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवणारा धामापूर तलाव हा महाराष्ट्रातील पहिला आणि एकमेव तलाव आहे.


सतत 5 वर्षे पाणथळ जागांच्या संवर्धनात्मक कार्यामुळे धामापूर तलावाच्या विविध पैलूंचा सखोल अभ्यास झाला. धामापूर तलावाकिनारी सापडलेल्या दुर्मिळ सजीवांचा अधिवास, तलाव व मंदिराचा मौखिक आणि लिखित इतिहास, गावसमाज व मंदिराचा स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून झालेला अभ्यास, जुन्या काळातील सिंचन पद्धती अशा अनेक विषयांचे सखोल अध्ययन विशेषज्ञाकडून करण्यात आले. या अभ्यासामुळे धामापूर तलाव हा केवळ एक पाण्याचा साठा नसून 500 वर्षांपासून हस्तांतरित करण्यात आलेला जिवंत वारसा आहे, हे डोळ्यासमोर आले.


500 वर्षांचा दीर्घ प्रवास सांगणारी कथा


या जिवंत वारशाचे अस्तित्व अबाधित राहावे आणि धामापूर तलाव रचनेतून दृग्गोचर होणारी कोकणातील जुन्या जाणत्या माणसाची अलौकिक दूरदृष्टी जगासमोर यावी या उद्देशाने ‘मी धामापूर तलाव बोलतोय’ (Mi Dhamapur Talav Boltoy) या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. पूर्णपणे लोकसहभागातून बनलेल्या या लघुपटात थेट धामापूर तलावच त्याचा 500 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास सांगणार आहे. या लघुपटाची प्रस्तुती धामापूर येथील स्यमंतक ‘जीवन शिक्षण विद्यापीठ’मार्फत करण्यात आली आहे. ‘मी धामापूर तलाव बोलतोय’ लघुपट तलावाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देईल. या 10 मिनिटाच्या लघुपट सादरीकरणाआधी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचे चर्चासत्र असेल.


दिग्गजांच्या चर्चा सत्राचे आयोजन


डॉ. विद्या कामत या दंतकथा आणि लोककथा यांचे समाजजीवन आणि पर्यावरणातील महत्व यावर माहिती देतील. पर्यावरणीय कायदे या विषयावर स्टॅलिन दयानंद, पर्यावरणपूरक वास्तुरचना या विषयावर आर्किटेक्ट प्रतीक धामनेर, पाणथळ जागा व परिसंस्था विषयासाठी डॉ गोल्डीन कॉड्रॉस, शाश्वत विकास आणि पाणथळ जागांचे डॉक्युमेंटेशन - मोहम्मद शेख आणि प्राणिजीवन त्यांचे अधिवास व शाश्वत पर्यटन या विषयावर अविनाश भगत यांचे चर्चासत्र असेल. हा कार्यक्रम 9 ऑगस्ट 2022 रोजी आय ई एस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, बांद्रा येथे दुपारी 3 वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकरण्यात येणार नाही.


हेही वाचा :


Rangbaaz 3 : ‘रंगबाज’च्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, अभिनेता विनीत कुमार झळकणार मुख्य भूमिकेत!


Phone Bhoot Release Date: ‘फोन भूत’ चित्रपटाची रिलीज डेट बदलली! प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार!