O Sheth : 'ओ शेठ, तुम्ही नादच केलाय थेट' गाणं चोरीला! गीतकार-संगीतकारांचे गायकावर गंभीर आरोप, गायक म्हणाले
ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट' (O Shet Marathi song) गाणं बनवलंय प्रणिकेत खुणे आणि संध्या केशे यांनी. तर गायलं उमेश गवळी यांनी.आता हेच गाणं चोरीला गेल्याचा आरोप या गाण्याच्या निर्मात्यांनी केला आहे.
मुंबई : सोशल मीडियातून (Social Media) कधी कोण हिरो होईल आणि कधी कुणी झिरो होईल हे सांगता येत नाही. आपली एखादी गोष्ट इथं कधी ट्रेंड होईल हे सांगता येत नाही. त्यात यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्ममुळं अनेकांना आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली आहे. काही जणांनी या संधीचं सोनंही केलं आहे. सध्या यूट्यूब, फेसबुक, व्हाट्सऍप, इन्स्टाग्रामवर सगळीकडे "ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट' (O Shet Marathi song) या गाण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. हे गाणं बनवलंय म्हणजे लिहिलं, संगीतबद्ध केलं उस्मानाबादच्या प्रणिकेत खुणे (Praniket Khune) आणि नाशिकच्या संध्या केशे (Sandhya Keshe)यांनी. तर गायलं उमेश गवळी (umesh gawali) यांनी. आता हेच गाणं चोरीला गेल्याचा आरोप या गाण्याच्या निर्मात्यांनी केला आहे.
Web Exclusive : कसं तयार झालं 'ओ शेठ...' गाणं, 'ओ शेठ' कार प्रणिकेत खुणेसोबत थेट गप्पा
एबीपी माझा डिजिटलशी बोलताना प्रणिकेत खुणे आणि संध्या केशे यांनी सांगितलं की, गाण्याचे गायक उमेश गवळी यांनी गाण्याची चोरी केली आहे. या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार आम्ही आहोत आणि आमच्याच युट्युब चॅनेलला गायक उमेश गवळी यांनी स्ट्राईक टाकला आहे. युट्युब चॅनेलला स्ट्राईक टाकल्याने आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शिवाय आम्हाला आमच्याच कलाकृतीची चोरी झाल्यानं मानसिक त्रास देखील सहन करावा लागत आहे. प्रणिकेत खुणे म्हणाला की, या गाण्यामुळं मी, प्रणिकेत आणि गायक उमेश गवळी यांना संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेम मिळालं. मात्र गवळी यांनी असं पाऊल उचलल्यानं धक्का बसला आहे असं प्रणिकेत खुणेनं सांगितलं.
स्ट्राईक टाकल्याने आमचे मोठे आर्थिक आणि मानसिक नुकसान
प्रणिकेतनं एबीपी माझा डिजिटलशी बोलताना म्हटलं की, या गाण्याच्या मेकींग व्हिडिओचे राईट्स आपल्याला मिळावेत अशी विनंती उमेश गवळी यांनी माझ्याकडे केली, वास्तविक उमेश गवळी यांना अतिशय कमी मानधन आम्ही दिले असल्याने त्यांना देखील या गाण्याच्या माध्यमातून जास्तीचे मानधन मिळावे म्हणून आम्ही त्या राईट्स देण्याचे ठरवले. मात्र त्यांनी आमच्याच युट्युब चॅनेलला स्ट्राईक टाकल्याने आमचे मोठे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे. प्रणिकेत सांगतो की, आम्ही त्यांच्याशी वारंवार मोबाईलवरून संभाषण केले आहे. त्याचे कॉल रेकॉर्डिंग देखील आमच्याकडे आहेत. याबाबत बसून चर्चा करण्यासाठी आम्हाला उमेश गवळी यांनी पुण्याला येण्याचे सांगितले होते. त्यानुसार आम्ही पुण्याला देखील जाणार होतो. मात्र उमेश गवळी यांनी स्ट्राईक काढला नसल्याने आमच्या चॅनेलवरून कॉपीराईटमुळे हे गाणं काढून टाकण्यात आलं, असा आरोप संध्या आणि प्रणिकेत या दोघांनी केलाय.
संध्या केशेनं म्हटलं की, ओ शेठ गाण्याचे सर्व हक्क आमच्याकडे आहेत. गायक उमेश गवळी यांनी याआधी वेगवेगळ्या माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आमचा वारंवार उल्लेख या गाण्याचे गीतकार-संगीतकार असा केला आहे. असं असताना ते आता अशा पद्धतीने गाण्यावर हक्क सांगत आहेत. याबाबत आम्ही पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितल्यानंतर समेट करू असं सांगणाऱ्या उमेश गवळी यांनी गाण्यावर हक्क सांगितल्याने आमचे उत्पन्नाचे साधनच बंद झाले असल्याचे म्हणत आपल्याला न्याय मिळावा अशी भावना संध्या-प्रणिकेतने व्यक्त केली आहे.
प्रतिकूल परिस्थितीतून झाली गाण्याची निर्मिती
प्रणिकेत हा उस्मानाबादचा तर संध्या नाशिकची. दोघांनाही कलेची प्रचंड आवड. घरची परिस्थिती बेताची असताना आपलं कलाप्रेम त्यांनी टिकवलं आणि दर्जेदार गाण्यांची निर्मिती केली आहे. या जोडीने तब्बल चार वर्षांपासून एकत्र काम करत जवळपास 50 गाणी लिहिली आहेत आणि संगीतबद्ध केली आहे. लॉकडाऊनच्या काळात ओ शेठ हे गाणं बनलं. या गाण्याची निर्मिती तीन ठिकाणी झाली. गाणं लिहिलं गेलं उस्मानाबाद आणि नाशिकमध्ये तर गायलं गेलं पुण्यात. त्यानंतरचे संपादनाचे संस्कार हे उस्मानाबादमध्ये झाले. प्रतिकूल परिस्थितीतून बनवलेल्या कलाकृतीवर जवळच्या समजल्या जाणाऱ्या व्यक्तिकडूनच दावा सांगत स्ट्राईक आणल्याने संध्या आणि प्रणिकेत भावूक झाले आहेत. ओ शेठ गाण्याने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. मात्र आता याच गाण्याच्या हक्कावरून नवा वाद निर्माण झाल्याने संध्या- प्रणिकेतला नव्या संघर्षाचा सामना करावा लागत आहे.
गायक उमेश गवळी काय म्हणाले..
या सर्व प्रकरणावर एबीपी माझा डिजिटलनं ओ शेठ गायक उमेश गवळी यांची बाजू जाणून घेतली. गवळी म्हणाले की, आम्ही परस्पर समजुतीतून हे गाणं तयार केलं. या गाण्याचं कुणीही एक मालक नव्हतं, आम्ही तिघेही मालक होतो. या गाण्यासाठी त्या दोघांनी माझ्याशी संपर्क केला. मी आधीपासून गाणी गातो. मला या गाण्यासाठी कुठलंही मानधन मिळालं नाही. ऑडिओ त्यांच्या चॅनलला आणि व्हिडीओ माझ्या चॅनलला असं आमचं ठरलं होतं. माझ्या चॅनलला प्रतिसाद मिळाल्यावर त्यांनी माझा चॅनेल ब्लॉक केला. त्यांचे आरोप खोटे आहेत. माझ्याकडे मी गाणं पाठवल्याचे पुरावे आहेत, असं उमेश गवळी म्हणाले. गाण्याला माझं काही योगदान नाही असं म्हणणं चुकीचं आहे.
VIDEO : Web Exclusive : कसं तयार झालं 'ओ शेठ...' गाणं, 'ओ शेठ' कार प्रणिकेत खुणेसोबत थेट गप्पा
असं आहे ओ शेठ गाणं
जिथं तिथं चर्चा तुमची हो झालीओ शेठ
नावाला तुमच्या डिमांड आली
ओ शेSssठ
तुम्ही नादच केलाय थेटSong
ओ शेठ
तुम्ही माणूस हाय लय ग्रेट
नेटवर्क जाम तुम्ही केलया
नाव तुमचं व्हायरल झालया
व्हिडिओत तुमचाच गाजावाजा हाय
कुणावर माझा भरवसा न्हाय
ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट
ओ शेठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट
धोकेबाजांना दूर आता केलया
मनात तुम्हालाच ठेवलया
आपला जिगर ट्रिगर तुम्हीच हाय
उगाच बाता मी मारत न्हाय
ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट
ओ शेठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट
ट्रेंडिंग अपलोड झालया
उमेश न गाणं गायलया
संध्या प्रनिकेत नावात पावर हाय
मार्केटला गाणं हेच वाजणार हाय
ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट
ओ शेSssठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट…