Gadad Movie : मराठी चित्रपटामध्ये प्रेक्षकांना प्रथमच स्कूबा डायव्हिंग पहायला मिळणार आहे. अंडरवॉटर शूट केलेला सिनेमा सिल्व्हर स्क्रीनवर दिसणार आहे. हॉलिवूड तसंच बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपण यापूर्वी स्कूबा डायव्हिंग पाहिलं आहे, पण 'गडद' या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं ते प्रथमच मराठी चित्रपटाच्या पडद्यावर दिसणार आहे. 'गडद' या चित्रपटाचं लक्ष वेधून घेणारं मोशन पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं. याप्रसंगी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.


इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी 'गडद'च्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. दिग्दर्शक प्रज्ञेश कदम या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून, लेखनही त्यांनीच केलं आहे. प्रज्ञेशचा हा दिग्दर्शकाच्या रूपातील पहिलाच चित्रपट आहे. पदार्पणातच त्यांनी स्कूबा डायव्हिंगसह शूटिंग करण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर लगेचच मालदिव्ज आणि गोव्यात शूटिंगला सुरुवात करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं मराठी चित्रपटात प्रथमच प्रेक्षकांना पाण्याखालचा गडद रंग पहायला मिळणार आहे. चित्रपटाचं शीर्षक आणि रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरवरून यात नेमकं कशा प्रकारचं कथानक पहायला मिळणार याचा जराही थांगपत्ता लागत नाही. त्यामुळं या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. सध्या मराठीत सुरू असलेल्या ट्रेंडपेक्षा 'गडद' हा चित्रपट आपले काहीसे वेगळे रंग दाखवणार असल्याचे संकेत मात्र पोस्टरवरून नक्कीच मिळतात. 


मिताली मयेकर, सुयोग गोऱ्हे, शुभांगी तांबाळे, नितीन गावंडे, आरती शिंदे आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. संगीत रोहित श्याम राऊतचं आहे, तर सिनेमॅटोग्राफी वेंकटेश प्रसाद करणार आहे. मंदार लालगे आणि नितीन गावंडे या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्युसर असून, प्रवीण वानखेडे कार्यकारी निर्माते आहेत. अभिषेक खणकर यांनी 'गडद'साठी गीतलेखन केलं असून, आदिनाथ पोहनकर यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. कॅास्च्युम किरण बुराडे यांनी केले आहेत.


हेही वाचा :