Manohar Joshi In Movie :  बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक,  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसैनिकांचे सर असलेले मनोहर जोशी (Manohar Joshi Passed Away) यांचे निधन झालं. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या (Mumbai) हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवसेनेचा आक्रमक चेहरा असतानाही मनोहर जोशी यांचे शांत व्यक्तीमत्त्व ठळकपणे दिसून येत होते. त्यांचे हे व्यक्तीमत्व रुपेरी पडद्यावर दिसून आले.


शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ठाकरे चित्रपटात मनोहर जोशी यांचीही व्यक्तिरेखा दाखवण्यात आली. जोशी सरांचे व्यक्तीमत्त्व  रुपेरी पडद्यावर अगदी हुबेहुबे साकारले गेले. कवी-अभिनेता असलेल्या संदीप खरे याने ही भूमिका साकारली. मनोहर जोशी यांची भूमिका साकारताना त्यांचे व्यक्तीमत्त्व त्यात उतरेल याची अधिक काळजी घेतली असल्याचे संदीप खरे याने 'एबीपी माझा'सोबत बोलताना सांगितले. 


शूटिंगच्या दोन दिवस आधीच कास्टिंग...


संदीप खरे याने सांगितले की, खरंतर ठाकरे चित्रपटात मला भूमिकेसाठी विचारणा होणे हाच मोठा सुखद धक्का होता. माझा मित्र दिग्दर्शक अभिजित पानसे याने मला मनोहर जोशी यांच्या भूमिकेसाठी विचारणा केली. अभिजित पानसेसाठी हा महत्त्वाचा प्रोजेक्ट होता. त्यात त्याने माझ्यावर विश्वास दाखवला. बायोस्कोपमधील मित्रा मधील माझी भूमिका पाहून त्याने ठाकरे चित्रपटात संधी दिली असल्याचे संदीपने सांगितले.  


मनोहर जोशी यांच्या भूमिकेची तयारी कशी?


शूटिंगच्या काही दिवस आधीच भूमिकेसाठी विचारणा झाल्याने तयारीसाठी फारसा वेळ नव्हता असे संदीपने सांगितले. मनोहर जोशी यांच्या भूमिकेसाठी विचारणा होणे हाच सुखद धक्का होता, असेही त्याने म्हटले. 


खूप वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात मनोहर जोशी यांची भेट झाली होती. मात्र, कार्यक्रमातील भेट असल्याने फार काही बोलणं झाले नव्हते. मनोहर जोशी यांच्याबद्दल वाचन करणे, वृत्तपत्रातील कात्रणे वाचणे यातून त्यांचे व्यक्तीमत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अभिजित पानसेसोबत चर्चा करून जोशी सरांची भूमिका साकारली असल्याचे  संदीप खरेने सांगितले. चित्रपटात काम करताना त्यांना हुबेहुबे कॉपी करण्याचे टाळले. त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील पैलू पडद्यावर कसे उतरतील याची काळजी घेतली असल्याचे संदीप खरेने सांगितले. 


जोशी सरांच्या भूमिकेचे झाले कौतुक


मनोहर जोशी यांच्याबद्दल आदराची भावना असल्याचे संदीप खरे याने सांगितले. मनोहर जोशी हे गरिबीतून वर आले. आपल्या कामातून, कार्यातून त्यांनी स्वत:चा ठसा उमटवला. 'ठाकरे' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मनोहर जोशी यांच्या भूमिकेबद्दल चित्रपटसृष्टीतील अनेकांसह इतरांनी कौतुक केले. संजय राऊत यांनाही भूमिका आवडली असेही संदीप खरे याने सांगितले. 


 इतर संबंधित बातम्या :