Mangesh Desai : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट निर्माते मंगेश देसाई (Mangesh Desai) यांच्या कारचा काल (10 जुलै) अपघात झाला होता. मंगेश देसाई हे कुटुंबासोबत कर्जत येथे जात होते. यावेळी वाशी, कोकण भवन परिसरात कारचा अपघात झाला आहे. सुदैवाने मंगेश देसाई आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना कोणालाही दुखापत झालेली नाही. या अपघातात मंगेश यांच्या गाडीचे नुकसान झाले. अपघातानंतर मंगेश यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
मंगेश देसाई यांची पोस्ट
'आज झालेल्या अपघातामध्ये फक्त गाडीचे नुकसान झाले आहे. ईश्वराच्या कृपेने आम्ही सुखरुप आहोत. काळजी नसावी. धन्यवाद.', अशी पोस्ट मंगेश देसाई यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टला त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता प्रथमेश परबनं देखील मंगेश यांच्या पोस्टला 'टेक केअर सर'अशी कमेंट केली आहे. या पोस्टला मंगेश यांनी कॅप्शन दिलं, 'तुम्ही केलेल्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल तुमचे आभार मानतो'
मंगेश देसाई यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती
मंगेश देसाई यांनी एक अलबेला या चित्रपटामध्ये अभिनेत्री विद्या बालनसोबत काम केलं आहे. बायोस्कोप, हुप्पा हुय्या या चित्रपटांमधील मंगेश यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मंगेश देसाई यांचा 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. मंगेश यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्रसाद ओक, श्रुती मराठे, गश्मीर महाजनी, क्षितिश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अभिजित खांडकेकर, मोहन जोशी, स्नेहल तरडे या कलाकांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. सध्या हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
हेही वाचा: