Dharmaveer Movie : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. प्रेक्षकांचं प्रेम चित्रपटाला लाभल्यानंतर आता चित्रपटाचा पुरस्कारांनीही गौरव होऊ लागला असून, दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने चित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे.
अभिनेता मंगेश देसाई (Mangesh Desai) यांच्या साहील मोशन पिक्चर्सनं आणि झी स्टुडिओजने ‘धर्मवीर’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, प्रवीण तरडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात प्रसाद ओक, श्रुती मराठे, गश्मीर महाजनी, क्षितिश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अभिजित खांडकेकर, मोहन जोशी, स्नेहल तरडे आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
ठाणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेना हा पक्ष रुजवणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनपट या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. 13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद मिळाल्याने बॉक्स ऑफिसवर चित्रपट दमदार कामगिरी करत सुपरहिट ठरला. त्यानंतर आता दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्ड या पुरस्काराने चित्रपटाला सन्मानित करण्यात आल्याने चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे.
13 मे रोजी 'धर्मवीर' हा चित्रपट तब्बल चारशेहून अधिक सिनेमागृहे आणि 10 हजारांहून अधिक शोजसह प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाने सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले होते. अजूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे.
आनंद दिघेंच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी उमटवली पसंतीची ठसठशीत मोहोर
हिंदी चित्रपटांना गर्दी करणारे प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जातं. पण, 'धर्मवीर'ने बॉक्स ऑफिसवरच्या घवघवीत यशाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा मराठी चित्रपटाकडे खेचून आणल्याचं सुखद चित्र दिसत आहे. अभिनेते प्रसाद ओक यांनी साकारलेल्या आनंद दिघे यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली आहे.
'धर्मवीर' चित्रपटासाठी केलेली अपार मेहनत व हा चित्रपट कारकिर्दीला कसा नवं वळण देणारा ठरला हे यशोगाथेतून सांगताना, मराठी चित्रपटांच्या यशाचा मापदंड म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाईल, असं अभिनेता प्रसाद ओक म्हणतो. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेला हा लोकनेता सर्वसामान्यांच्या मनात आजही जिवंत आहे, मला आणि माझ्या भूमिकेला मिळलेलं प्रेम त्याचीच पोचपावती असल्याचं प्रसाद ओक म्हणाला.
संबंधित बातम्या