Mangesh Desai : ‘धर्मवीर’ (Dharmaveer) चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाई (Mangesh Desai) यांनी त्यांच्यातल्या संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं आहे. आर्थिक अडचणींमुळे आपल्या मुलावर वैद्यकीय उपचार करू न शकणाऱ्या रंगभूषा कलाकाराला आर्थिक मदत त्यांनी केली. विशेष म्हणजे, ही आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. रंगभूषा कलावंत विजय हर्णे यांच्या आजारी मुलाला रुग्णालयात दाखल करावे लागले.
पण, मुलावर उपचार करण्याइतकी हर्णे यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे मित्रमंडळी-ओळखीच्यांकडून आर्थिक मदत मिळवून उपचार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांना काही पैसे मिळाले नाहीत. उपचाराअभावी मुलाची तब्येत खालावत होती. अखेर त्यांनी त्यांच्या परिचयाचे असलेले दिग्दर्शक अमोल भावे यांना मदतीसाठी संपर्क साधला. भावे यांनी हर्णे यांना मंगेश देसाई यांच्याशी जोडून दिले. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मंगेश देसाई यांनी मदत करण्याचे आश्वासन न देता लगेचच उपचार सुरू करून दिले. त्यानंतर मुलाची तब्येत सुधारल्यावर आणि डॉक्टरांनी रुग्णालयातून सोडताना रुग्णालयाचे बिलही भरले.
मंगेश देसाई आणि मुख्यमंत्र्यांचे मानले आभार!
याबाबत हर्णै म्हणाले की, मुलावर व्यवस्थित उपचार होऊन तो सुखरूप घरी परत आला याचा आनंद आहे. या काळात मंगेश देसाई सातत्याने संपर्क साधत होते, मुलाच्या तब्येतीची चौकशी करत होते. रुग्णालयातून घरी परतल्यावर मदत केल्याबद्दल आभार मानण्यासाठी यांनी मंगेश देसाई यांना फोन केला. त्यावेळी ते म्हणाले, की मी केवळ निमित्तमात्र आहे, ही आर्थिक मदत मी नाही, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब आणि मंगेश देसाई यांचे आभार शब्दांत व्यक्त करता येणार नाही. मी त्यांचा जीवनभर ऋणी राहीन.
मंगेश देसाईंची मुख्यमंत्र्यांसाठीची पोस्ट चर्चेत!
‘धर्मवीर’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर मंगेश देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली होती. यात त्यांनी एक आठवण शेअर केली होती. त्यांनी लिहिलेले की, ‘वागळे इस्टेटमध्ये एका कार्यक्रमाला भेटलो होतो 2007 साली. तुम्ही आमदार होतात त्या वेळी. तुम्हाला पहिल्यांदा भेटलो होतो. तसा तुम्हाला बघून घाबरलो होतो. पण तुम्ही खूप छान बोललात. सचिन जोशीला मला तुमचं व्हिझिटींग कार्ड द्यायला लावलत आणि काहीही मदत लागली तर सांगा असं आवर्जून म्हणालात. माझ्या सारख्या सामान्य कलाकाराला मदत लागणारच. तीही तुम्ही एका मिनटात केलीतही आणि त्या मदतीचे आभार म्हणून मी तुम्हाला तुमचंच एक भित्तीचित्र भेट म्हणून द्यायला आलो होतो तेव्हाचे तुमचे शब्द मला आठवतात, हे कशाला ?आपण मित्र आहोत मंगेश आणि खरंच मित्र झालात’.
संबंधित बातम्या