Nashik News : एखाद्याला मोठ्या पडद्यावर पाहणं किंवा स्वतः पडद्यावर झळकणं, हे कमालीचं भारी असत. त्यामुळे आज अनेकांचा युट्युब (Youtube) आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून शॉर्टफिल्म (Shortfilm)), डॉक्युमेंट्री बनवण्याकडे कल वाढला आहे. अनेकजण तर आता मोबाईलवर सिनेमा बनवत आहेत. अशाच एका गावाकडच्या अवलियाने स्वतःच स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेमाला समर्पित 'मन जडलं' नावाचा चित्रपट बनवला आहे. 


सध्या अनेकजण चित्रपटसृष्ठीकडे येत आहेत. शिवाय शॉर्टफिल्म किंवा चित्रपट बनविण्यासाठी साधने उपलब्ध झाल्याने खूप कमी खर्चात चांगला विषय लोकांपुढे तरुणांच्या माध्यमातून आणला जात आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी येथील धडपडणाऱ्या तरुणाने रात्र दिवस एक करत प्रेम फुलविणारा 'मन जडलं' (Man Jadala) नावाचा चित्रपट बनवला आहे. आर्थिक परिस्थिती नसतांना गावाकडच्या निसर्गाच्या सानिध्यात आणि स्वतःचे कौशल्य वापरत फोटोग्राफीचा व्यवसाय करणाऱ्या सुनिल गांगुर्डे या होतकरु तरुणाने 'मन जडलं' या नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील इतर होतकरू तरुणांना या चित्रपटामुळे गावाकडं नवे प्रयोग करण्याला पाठबळ मिळाले आहे. 


सप्तशृंगी देवी मंदिर असलेल्या वणी गावात राहणाऱ्या सुनील गांगुर्डे (sunil gangurde) हे व्यवसायासाने फोटोग्राफी करतात. तर गांगुर्डे यांचे वडील नंदलाल गांगुर्डे हे वणी ग्रामपंचायतीचे निवृत्त कर्मचारी आहेत. सुनील हे अनेक वर्षांपासून फोटोग्राफीची आवड असल्याने ग्रामीण भागातील निसर्ग सौंदर्य, त्यातून मिळणारे विषय, प्राणी, गाव, अशा विविध पैलूंना फोटोग्राफीतून पडद्यावर आणले. याच आशेतून सुनिल गांगुर्डे या तरुणाने पाच वर्षांपूर्वी मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. हाती फक्त कौशल्य होते, आर्थिक परिस्थिती नव्हती, मात्र जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर चित्रपट निर्मितीचे ध्येय उराशी बाळगुन आर्थिक समस्या व अनेक अडचणींवर मात करुन 'मन जडलं' या मराठी रोमँटिक चित्रपटाची निर्मिती केली आहे.


विशेष म्हणजे या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती हि स्वतः सुनिल गांगुर्डे यांनीच केली असून चित्रपटात स्थानिक व ग्रामिण भागातील नवोदीत कलाकारांना चित्रपटात अभिनयाची संधी दिली आहे. वणी येथील श्री खंडेराव महाराज मंदीर पटांगणात सोमवारी 'मन जडलं' सिनेमाचे गाणे व पोस्टर प्रदर्शीत हजारो वणी गावातील ग्रामस्थांच्या साक्षीने करण्यात आले. यावेळी चित्रपटाचा कलाकारांची प्रेक्षकांमधून स्टेजवर आगमन होवून परीचय करुन देत, चित्रपट शुटिंग दरम्यानचे अनूभव कथन केले. यानंतर कलाकार व मान्यवरांच्या हस्ते गाणे व पोस्टर यावेळी प्रदर्शित केले. मार्च महिन्यात मन जडल हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात येणार आहे.