World Meteorological Organization : मुंबई आणि जगभरातील किनारपट्टी भागातील शहरांसाठी धोका असल्याचा अंदाज जागतिक हवामान संघटनेने वर्तवला आहे. हवामान बदल आणि त्यातून घडणाऱ्या बदलांचे संकेत मिळत असल्याचे हवामान संघटनेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील शहरांसाठी धोक्याची घंटा वर्तवण्यात येत आहे. हवामान बदलामुळे मुंबईतील काही भाग 2050 पर्यंत पाण्याखाली जाणार असा अहवाल गेल्या काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आला होता. मात्र, ही वेळ आणखी लवकर येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  


जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार, "जगभरातील समुद्र पातळी 2013 ते 2022 या कालावधीत प्रतिवर्षी 4.5 मिटरने वाढली आहे. 1971 पासून मानवी हस्तक्षेप यास कारणीभूत आहे. समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळे सखल भागातील बेटांना धोका आहे. भारत, चीन, नेदरलँड आणि बांगलादेशसारख्या देशांना अधिक धोका आहे. या देशांमध्ये मोठ्या किनारपट्टीलगत अधिक लोकसंख्येचा समावेश आहे. हवामान बदलामुळे मुंबई, शांघाय, ढाका, बॅंकॉक, जकार्ता, मापुटो, लागोस, कैरो, लंडन, कोपनहेगन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, ब्युनोस आयर्स आणि सॅंटियागोसारख्या मोठ्या शहरांना धोका आहे. 


वाढती समुद्र पातळी ही आर्थिक, सामाजिक आणि मानवतेच्या दृष्टीनं एक मोठं आव्हान असल्याचं जागतिक हवामान संघटनेकडून आपल्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. 1901 ते 2018 दरम्यान जगभरातील समुद्र पातळी सरासरी 0.20 मीटरने वाढली आहे. समुद्र पातळी वाढीचा दर 1901 ते 1971 दरम्यान प्रति वर्ष 1.3 मिमी बघायला मिळाला. 1971 ते 2006 दरम्यान प्रति वर्ष 1.9 मिमी आणि 2006 ते 2018 दरम्यान प्रति वर्ष 3.7 मिमी इतका होता. मागील तीन हजार वर्षात जितक्या जास्त वेगानं समुद्राची पातळी वाढली नाही त्याहून अधिक वेगानं 1900 पासून वाढल्याचं हवामान संघटनेच्या अहवालातून समोर आलं आहे.  


पुढील दोन हजार वर्षांमध्ये तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित राहिली तरी समुद्राची पातळी 2 ते 3 मीटरने वाढेल. जर 2 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित असल्यास 2 ते 6 मीटरने वाढेल आणि तापमान वाढ पाच अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यास 19 ते 22 मीटरने वाढेल आणि त्यापुढेही पातळी वाढतच राहण्याचा अंदाज हवामान संघटनेने वर्तवला आहे. अधिक हरितगृह वायू उत्सर्जन झाल्यास किंवा कमी करण्यास अपयशी ठरल्यास 2100 पर्यंत समुद्र पातळी दोन मीटर आणि 2300 पर्यंत 15 मीटरनं वाढण्याचा धोका असल्याचं अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे.  


अहवालानुसार, गेल्या शतकात महासागर अधिक वेगानं गरम झाला, जो 11 हजार वर्षांमध्ये देखील बघायला मिळाला नाही. समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यानं किनारपट्टीवरील इकोसिस्टिमचं नुकसान, भूजलाचे क्षारीकरण, पूर, किनारपट्टी भागातील पायाभूत सुविधांना नुकसान, सोबतच लोकांच्या उपजिविका, वसाहती, आरोग्य, अन्न, विस्थापन आणि जलसुरक्षेला धोका निर्माण होईल, सोबतच सांस्कृतिक मूल्यांना देखील धोका पोहोचेल. 


हवामान बदलामुळे दक्षिण मुंबईतील काही भाग पाण्याखाली जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्यातच आता जागतिक हवामान संघटनेकडून पुन्हा एकदा वाढत असलेल्या समुद्र पातळीबद्दल सूचक इशारा दिल्याने आताच सावध होण्याची गरज असल्याच तज्ज्ञांचे मत आहे.