Mahaparinirvan Movie Song Dr Babasaheb Ambedkar : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनी, मागील वर्षी 'महापरिनिर्वाण' या चित्रपटाची (Mahaparinirvan Movie) घोषणा करत फर्स्ट लूक लाँच करण्यात आला. या फर्स्ट लूकनंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता निर्माण झाली होती. त्यानंतर आज, 'महापरिनिर्वाण' चित्रपटाच्या टीमच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना संगीतमय मानवंदना देण्यात आली आहे. या चित्रपटातील 'जय भीम' हे गाणं आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


भारतातील शोषित, वंचित, महिलांच्या हक्कासाठी संघर्ष करणारे, सामाजिक न्याय हक्क आणि समतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठा संघर्ष उभा केला. राज्यघटनेच्या माध्यमातून समाजातील सामाजिक विषमता दूर करण्यासाठीच्या तरतुदी केल्या. हजारो वर्षांची सामाजिक गुलामगिरी बाबासाहेब आंबेडकरांनी दूर केली. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर  सारा देश हळहळला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर मुंबईत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लाखोंची गर्दी उसळली होती. 


बाबासाहेबांच्या  अंत्ययात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आली होती. त्यावेळी मुंबईत दु:खाचे वातावरण होते.  हा मन हेलावणारा क्षण टिपणारे नामदेवराव व्हटकर यांची जीवनगाथा या 'महापरिनिर्वाण' चित्रपटात पाहायला मिळणार आहे.






'महापरिनिर्वाण' या चित्रपटाची चर्चा सुरू असताना आता यातील एक गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. 'जय भीम' हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. शाहीर नंदेश उमप यांनी 'जय भीम' हे गाणं गायलं आहे. तर, अमोल कदम यांनी लिहिलेल्या गीताला रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केले आहे. 


तगडी स्टारकास्ट असलेला 'महापरिनिर्वाण'


 






'महापरिनिर्वाण' हा चित्रपट या ऐतिहासिक प्रसंगाचा समाजावर आणि त्या व्यक्तीच्या जीवनावर झालेल्या खोल परिणामांवर प्रकाश टाकणारा आहे. या चित्रपटाद्वारे प्रसाद ओक, गौरव मोरे, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर,  प्रफ्फुल सावंत , विजय निकम , हेमल इंगळे, कुणाल मेश्राम यासारखे नामवंत कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शैलेंद्र बागडे यांनी केले असून निर्मिती सुनिल शेळके यांनी केली आहे. हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.