Kiran Mane : महाराष्ट्रात लोकसभेचा (Lok Sabha Election 2024) निकाल जाहीर होताच एकच जल्लोष सुरु झाला. महाराष्ट्राचा निकाल हा खरंच देशाचा राजकारणात निर्णयाक ठरणार का? हे अवघ्या काही दिवसांत स्पष्ट होईलच. पण त्याआधी महाराष्ट्राच्या (Maharshtra) निकालाने दिल्लीला देखील चांगलाच धक्का बसला असल्याची चिन्ह आहेत. कारण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 आणि महायुतीला 17 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी यंदाच्या लोकसभेचा गुलाल उधाळला. 


दरम्यान या लोकसभेच्या आधी राजकीय नेत्यांकडून अनेक वार प्रतिवार होत होते. त्यातच भाजपचे नेते आशिष शेलार यांनी तर जर महाविकास आघाडीच्या 18 जागा निवडून आल्या तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन असंच म्हटलं होतं. आता ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी आशिष शेलारांचा तो व्हिडिओ शेअर करत त्यांनाच सवाल केला आहे. दरम्यान सोशल मीडियावरही आशिष शेलारांचा हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केलाय. 


आशिष शेलारांनी काय म्हटलं होतं?


उद्धव ठाकरे यांना माझं जाहीर आवाहन आहे, जर लोकसभेत भारतीय जनता पक्षाने 45 च्या वर जागा मिळवल्या तर तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रतिआव्हान देतो की, देशात जाऊद्या, महाराष्ट्रात तुम्ही गेल्यावेळी आमच्यासोबत होतात म्हणून 18 होतात आता तुम्ही महाविकास आघाडी म्हणून जरी 18 आला तरी मी राजकारण सोडून देईन. 


किरण मानेंनी काय म्हटलं?


आशिष शेलारांच्या प्रतिआव्हाना प्रमाणे जर महाविकास आघाडीला 18 जागा मिळाल्या असत्या तर आशिष शेलार राजकारण सोडणार होते. पण आता महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या. त्यामुळे किरण माने यांनी त्यांचा हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, 'खरा मर्द दिलेला शब्द पाळतो. आशिषजी तुम्ही तो पाळणार याची खात्री आहे.'           



आशिष शेलारांचा हा व्हिडिओ सध्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून शेअर करण्यात येतोय. सुषमा अंधारे, सचिन सावंत यांनी देखील हा व्हिडिओ शेअर केली. त्यामुळे यावर आता आशिष शेलार काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.                                           


ही बातमी वाचा : 


Lok Sabha Result 2024 : अरुण गोविल यांची लोकसभेत एन्ट्री, तर मनोज तिवारींनी तिसऱ्यांना मारलं दिल्लीचं मैदान, लोकसभेच्या रिंगणात भाजपच्या सेलिब्रेटींचा 'ब्लॉकबास्टर' निकाल