Nashik News : गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) मंगळवारी जाहीर होत आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आणि भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) हे विजयी झाले आहेत. या विजयानंतर भास्कर भगरे यांच्या पत्नी आणि राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला आहे. 


सर्वसामान्य कार्यकर्ते आमच्या सोबत होते तेच आमचे बळ


यावेळी भास्कर भगरे यांच्या पत्नी म्हणाल्या की, सरांचा विजय हा मोठा विजय आहे. हा विजय स्वप्नासारखा वाटत आहे.  अजूनही वाटत नाही भगरे सर विजयी झाले आहेत. शरद पवार साहेबांनी तळागाळातील कार्यकर्त्याला उमेदवार दिली. आयुष्यभर त्यांचे मी ऋणी राहील.  सरांकडून आम्हाला शेतकऱ्यांची कामे करून घ्यायची आहे.  मी स्वतः भास्कर भगरे सरांच्या मागे उभे राहून कार्यकर्त्यांची कामे करून घेणार आहे. सरांनी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत त्यांची कामे केली पाहिजे. सरांनी कुटुंबाकडे लक्ष दिले नाही तरी चालेल, अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे.  निवडणुकीत केंद्रीय मंत्र्यांचे आव्हान होते. मात्र, आम्ही शेवटपर्यंत आशावादी राहिलो. विरोधात केंद्रीय मंत्री होत्या म्हणून टेन्शन होतं. मात्र सर्वसामान्य कार्यकर्ते आमच्या सोबत होते तेच आमचे बळ होते.  


राजाभाऊंच्या विजयाचा आनंद


राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी म्हणाल्या की, राजाभाऊंच्या विजयाचा आनंद आहे. सिन्नरची जबाबदारी माझ्यावर होती. पण, सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्यांची मी ऋणी आहे. सिन्नरच्या जनतेवर आमचा विश्वास होता. उमेदवारी मिळेल हा अनपेक्षित निर्णय होता. सिन्नरला खासदारकीचा पहिला मान मिळाला त्याचा आम्हा सर्वांना आनंद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 


दिंडोरीतील विजय हा सर्वसामान्यांचा : भास्कर भगरे


दिंडोरीतील विजय हा सर्वसामान्यांचा विजय आहे. जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक होती. माझ्या नावाचा उमेदवार उभा करून माझ्या विरोधात राजकीय खेळी खेळली गेली.  अपेक्षित विजय आहे, हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया भास्कर भगरे यांनी दिली आहे. 


हा विजय जनतेचा : राजाभाऊ वाजे 


माझ्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या सर्वांनी मेहनत घेतली आहे. संजय राऊत यांनी फोन करून माझे अभिनंदन केले. हा विजय जनतेचा आहे, विजयी जल्लोष शांततेत करावा. नाशिकच्या विकासाचा निर्धार आहे.  त्यावर पुन्हा सविस्तर बोलले, अशी प्रतिक्रिया राजाभाऊ वाजे यांनी दिली आहे.


दिंडोरीतून भास्कर भगरेंचा 1 लाख 13 हजार 199 मतांनी विजय


मविआ : भास्कर भगरे - 5,77,339 - विजयी 


महायुती : भारती पवार - 4,64,140 - पराभूत 


नाशिकमधून राजाभाऊ वाजेंचा 1 लाख 61 हजार 103 मतांनी विजय


मविआ : राजाभाऊ वाजे - 6 लाख 14 हजार 517 - विजयी


महायुती :  हेमंत गोडसे - 4 लाख 53 हजार 414 - पराभूत