Lata Mangeshkar Passes away  :  अनेक दशकं भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भारतीयांवर, संगीतप्रेमींवर शोककळा पसरली आहे. लतादीदी यांनी आपल्या अनेक दशकांच्या कारकिर्दीत अनेक टप्पे गाठले असले तरी त्यांच्या मनात एका गोष्टीची खंत कायम राहिली. पूर्णवेळ शास्त्रीय संगीत करता आलं नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत ही बाब सांगितली होती. 


लता मंगेशकर यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे प्रसिद्ध गायक, संगीकार होते. लता मंगेशकर यांनी गायनाचे धडे वडिलांकडून गिरवले होते. लता मंगेशकर यांना आपल्या संगीत कारकिर्दीत तीन-चार गुरु लाभले होते. मास्टर दिनानाथ मंगेशकर हे त्यांचे पहिले गुरु होते. त्यानंतर अमान अली खाँ भेंडीबाजारवाले, अमानत खाँ देवासवाले यांच्याकडे लता मंगेशकर यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. त्याशिवाय, बडे गुलाम अली खाँ साहेबांच्या एका शिष्याकडेही लता मंगेशकर शास्त्रीय संगीत शिकले. 


पुनर्जन्म मिळाला तर...


लता मंगेशकर यांचे शास्त्रीय संगीतावर प्रेम होते. मात्र, लहान वयात आलेल्या कौटुंबिक जबाबदारीमुळे लता मंगेशकर यांना पूर्णवेळ शास्त्रीय गायन करता आलं नाही. लता मंगेशकर यांनी एका मुलाखती सांगितले की,  पुनर्जन्म मिळाला तर मला शास्त्रीय संगीत गायला अधिक आवडेल. या जन्मात ही इच्छा अपूर्ण राहिली होती. कौटुंबिक जबाबदारींमुळे पार्श्वगायनातून बाहेर पडण्याचा विचार करू शकत नव्हते. शास्त्रीय संगीतासाठी वेळ देणे अशक्य होते. त्यामुळे माझ्या आवडीला नाईलाजे मुरड घालावी लागली असे लता मंगेशकर यांनी म्हटले. 


वयाच्या पाचव्या वर्षी लता मंगेशकर पहिल्यांदा नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यांची सुरुवात अभिनयापासून झाली असली, तरी त्यांची आवड फक्त संगीतात होती. 1942 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी त्या फक्त 13 वर्षांच्या होत्या. नवयुग फिल्म कंपनीचे मालक आणि त्यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी) यांनी त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आणि लता मंगेशकर यांना गायिका आणि अभिनेत्री बनण्यास मदत केली.