मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जाण्याने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सर्वजण आज त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात तशी 1942 मध्ये झाली. पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. मात्र त्या आधी 1938 साली त्यांनी सोलापुरात पहिल्यांदा गायन केलं होतं. त्यांनी ही खास आठवण आपल्या ट्विटरवरुन शेअर केली होती. लता मंगेशकर यांनी आपल्या आयुष्यातलं पहिलं क्लासिकल सादरीकरण हे सोलापुरात केलं होतें. तिथला एक खास फोटो देखील त्यांनी ट्वीट केला होता.
त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, आज आमच्या ओळखीचे उपेंद्रे चिंचोरे यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की मी माझा पहिला क्लासिकल परफॉर्मन्स माझ्या वडिलांसोबत 9 सप्टेंबर 1938 रोजी सोलापूर येथे केला होता. हा फोटो त्यावेळी प्रसिद्धी साठी काढला होता. विश्वास बसत नाही की गाणी गाता गाता 83 वर्ष पूर्ण झाली, असं लतादिदींनी म्हटलं होतं.
सोलापुरात पहिल्यांदा लता दीदींनी केलं होतं गायन
सोलापुरातल्या भागवत चित्रमंदिरात 9 सप्टेंबर 1938 साली लता दिदींचे वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्य़क्रमाचे आयोजक मास्टर दिनानाथ मंगेशकरांकडे या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आले होते. अवघ्या 9 वर्षाच्या लतादिदींनी हे सर्व ऐकले. ऐकल्यानंतर वडीलांसोबत गाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. यावेळी लता दिदींचे वाक्य ऐकून मास्टर दिनानाथ हसले आणि जाहिर मंचावर गाण्यासाठी तू खूप लहान आहे. तुला आणखी खूप गाणं शिकायचं आहे. असे म्हटल्याचे लता दिदी या मुलाखतीत सांगतात.
मात्र लता दिदींचे म्हणणे ऐकल्यानंतर कार्य़क्रमाच्या आय़ोजकांनी मास्टर दिनानाथांना विनंती केली. त्यांनी दीनानाथ मंगेशकरांना सांगितले की 'मंगेशकर कुटुंबातील दोन पिढ्यांची ही एक अनोखी मैफल असेल. त्यामुळे लता दिदींना गायला परवानगी द्यावी' शेवटी वडिलांकडून होकार मिळाल्यानंतर लता दिदींनी जवळच्या स्टुडिओत धाव घेतली आणि दुसऱ्या दिवशी फोटोशूट देखील केले. आपल्या कार्य़क्रमासाठी काढलेल्या फोटो संदर्भात लता दिदींनी स्वत: ट्विट करुन आठवणीला उजाळा देखील दिला होता.
आपल्या पहिल्या मंचावरील गायना संदर्भात बोलताना लता दिदी म्हणाल्या की 'आयोजकांनी पिता-पुत्री जलसा, एक अनोखा शो अशी जाहिरात केली होती. त्यामुळे भागवत चित्र मंदिर सभागृह रसिकांनी खचाखच भरले होते.' या कार्य़क्रमात लतादीदींनी राग खंबावतीमध्ये एक रचना गायली आणि त्यानंतर वडिलांच्या लोकप्रिय मराठी नाटकांपैकी एक गाणे देखील गायले. श्रोत्यांनी त्यांच्या गायनाला भरभरुन प्रतिसाद दिला. तसेच वडिलांनी देखील कौतुकाच्या नजरेने पाहिल्या नंतर मंचावरच वडीलांच्या शेजारी बसले. मी थकून मंचावरच वडिलांच्या मांडीवर झोपी गेले होते, अशी आठवण देखील लता दिदींनी एका मुलाखतीत सांगितली होती
अक्कलकोटच्या भोसले परिवाराशी अनेक वर्ष ऋणानुबंध
लता दीदी आणि अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख जन्मजेयराजे भोसले यांच्या परिवाराचे ऋणानुंबध अनेक वर्षांपासून आहेत. 1991 साली जेव्हा लता दीदी सोलापुरात आल्या तेव्हा त्यानी आवर्जुन अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. तसेच स्वत: पोळ्या लाटून अन्नछत्रात सेवा बजावली होती. भोसले कुटुंबियांशी असेलल्या ऋणानुबंधातूनच त्यांनी स्वत: दोन आलिशान गाड्या देखील भेट दिल्या होत्या. मर्सिडिज ब्रेंझ आणि शेव्हरलेट क्रुझ अशा दोन आलिशान गाड्या लता दीदींनी जन्मजेयराजेंना भेट दिली होती. आज ही त्यांची ही भेट अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळात दर्शनी भागात ठेवण्यात आल्या आहेत. मिनाताई मंगेशकर-खडीकर लिखित 'मोठी तिची सावली' य पुस्तकात जन्मजेयराजे भोसलेंचा उल्लेख घरातील माणसे असे करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक गुरुपौर्णिमेला पंडीत हृदयनाथ मंगेश आणि उषा मंगेशकर या देखील सांस्कृतिक सेवा स्वामींची मंदिरात करत आल्या आहेत. लता दिदींच्या निधनानंतर घरातील व्यक्ती गेल्याचा दुख: झाल्याची भावना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख जन्मजेयराजे भोसले यांनी व्यक्त केली.
संबंधित इतर बातम्या
Lata Mangeshkar passes away : युग संपले! लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट
Lata Mangeshkar Death : गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Remembering Lata Mangeshkar LIVE: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड