Dune : व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) आणि अॅनिमेशन स्टुडिओ ‘DNEG’ यांना 94व्या ऑस्कर पुरस्कार (Oscars 2022) सोहळ्यामध्ये 'सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स' श्रेणीतील दोन हॉलिवूड चित्रपटांसाठी नामांकन मिळाले होते. यापैकी एक चित्रपट 'ड्युन'ला आज इतर श्रेणींसह 'बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स' श्रेणीतही ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटासह 94व्या ऑस्करमध्ये DNEG ला 'सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स' श्रेणीत 'नो टाइम टू डाय' या चित्रपटासाठी देखील नामांकन मिळाले होते.
विशेष बाब म्हणजे डीएनईजी कंपनीचे सीईओ नमित मल्होत्रा (Namit Malhotra) हे भारतीय वंशाचे आहेत. नमित सध्या लंडनमध्ये राहत असून, डीएनईजीचे नेतृत्व करतात. 45 वर्षीय नमित हे सिनेमॅटोग्राफर एमएन मल्होत्रा यांचे चिरंजीव आणि चित्रपट निर्माते नरेश मल्होत्रा यांचे नातू आहेत. नमित यांचा जन्म मुंबईतच झाला आणि त्याचं बालपणही इथेच गेलं. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील खार भागातील 'जसुदबेन एमएल स्कूल'मधून झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतले.
नमित मल्होत्रा यांची ओळख
नमित यांना जगातील सर्वात मोठी स्वतंत्र आणि एकात्मिक मीडिया सर्व्हिस कंपनी ‘प्राइम फोकस लिमिटेड’चे संस्थापक म्हणूनही ओळखले जाते. स्पेशल इफेक्ट्सच्या क्षेत्रात काम करताना, 'प्राइम फोकस लिमिटेड'ला हॉलिवूड चित्रपट टायटॅनिकला 3D मध्ये रूपांतरित करण्यासाठी खास ओळख मिळाली. याशिवाय ही कंपनी अनेक सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटांचे स्पेशल इफेक्टचे काम सांभाळते. नमित मल्होत्रा यांनी 2014मध्ये त्यांची ‘प्राइम फोकस लिमिटेड’ कंपनी लंडन-आधारित व्हिज्युअल इफेक्ट स्टुडिओ ‘डबल निगेटिव्ह’ मध्ये (DNEG) विलीन केली.
1995मध्ये, नमित यांनी कॉम्प्युटर ग्राफिक्स स्कूलमध्ये प्रवेश घेतला, जिथे त्यांना समजले की, चित्रपटाचा मोठा भाग कॉम्प्युटरवर बनवला जाऊ शकतो. पुढे त्यांनी त्यांच्या वडिलांच्या गॅरेजमध्ये सुरू केलेल्या एडिटिंग स्टुडिओ 'व्हिडीओ वर्कशॉप'मध्ये सह-संस्थापक बनून आणि प्रशिक्षण संस्थेतून 3 शिक्षकांची नियुक्ती करून स्पेशल इफेक्ट्सच्या क्षेत्रात काम सुरू केले.
'प्राइम फोकस लिमिटेड'ची स्थापना
'व्हिडीओ वर्कशॉप'ने अनेक वर्षे विविध हिंदी मनोरंजन वाहिन्यांच्या अनेक लोकप्रिय शोसाठी ‘स्पेशल इफेक्ट’ सादर केले. 1997मध्ये नमित यांनी 'व्हिडीओ वर्कशॉप' आपल्या वडिलांच्या कंपनीत विलीन करून 'प्राइम फोकस लिमिटेड' ही कंपनी स्थापन करत, जगातील अनेक शहरांमध्ये आपली पाळेमुळे रोवली आणि भारतीय चित्रपटांसह जगभरातील चित्रपटांमध्ये विशेष योगदान दिले.
या आधीही कोरलंय ऑस्करवर नाव!
'Dune' च्या आधी, DNEG ला सहा हॉलिवूड चित्रपटांमध्ये स्पेशल इफेक्ट्ससाठी सहा अकादमी पुरस्कार मिळाले आहेत. 'Inception', 'Interstealer', 'Ex Machina', 'Blade Runner 2049', 'First Man' आणि 'Tenant' अशी या चित्रपटांची नावे आहेत.
‘आरआरआर’मध्येही योगदान
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या RRR चित्रपटामध्ये नमित मल्होत्रांची कंपनी DNEG ने VFX आणि स्पेशल इफेक्ट्सच्या माध्यमातून आपले खूप योगदान दिले आहे. आगामी हिंदी चित्रपटाबद्दल बोलायचे तर, डीएनईजीने रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन स्टारर फँटसी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’मध्ये व्हीएफएक्स आणि स्पेशल इफेक्ट्स देखील दिले आहेत.
अभिमान वाटतो : नमित मल्होत्रा
नमित मल्होत्रा यांनी 'ड्युन’ आणि ‘नो टाईम टू डाय'साठी ऑस्कर नामांकने मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना म्हटले की, ‘दोन्ही नामांकनांसाठी मी अकादमी पुरस्कारांचा अत्यंत आभारी आहे. अशा प्रकारे आमच्या कामाला मान्यता दिल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. अभिमान वाटतो आहे. ही नामांकनं DNEG च्या जगातील आघाडीची VFX आणि अॅनिमेशन कंपनी बनण्याच्या प्रयत्नांची साक्ष देतात.’
नमित मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली व्हँकुव्हर, टोरंटो, लॉस एंजेलिस, मुंबई, चेन्नई, चंदीगड, बंगळुरू यांसारख्या जगातील विविध शहरांमध्ये DNEG शाखा उघडण्यात आल्या आहेत. याशिवाय डीएनईजीचे लंडन, मॉन्ट्रियल येथेही स्टुडिओ आहेत. जगभरात पसरलेल्या DNEG कंपनीच्या स्टुडिओमध्ये सुमारे 7000 लोक काम करतात. नमित मल्होत्रांच्या स्पेशल इफेक्ट्स (VFX) आणि अॅनिमेशन स्टुडिओ कंपनी DNEG ने विविध लोकप्रिय चित्रपट, टीव्ही आणि वेब शोसाठी BAFTA आणि एमी अवॉर्ड्सपासून अनेक प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Oscars 2022 : विल स्मिथच्या शिरपेचात ऑस्करचा तुरा; पुरस्कार स्विकारताना अश्रू अनावर
- Oscars 2022 : ऑस्कर गोज टू... ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ड्युन सिनेमाचा डंका; पाहा नॉमिनेटेड आणि विजेत्यांची यादी
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावर राज्यपालांची अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया, म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha