Summer Tips : यंदा उन्हाळा (Summer) तीव्र स्वरुपाचा असल्याने मार्चमध्येच मे महिन्यातील उष्णता जाणवायला लागली आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान तब्बल 38 ते 41 अंशावर गेले आहे. उष्णता वाढली की, अनेक आजार देखील डोके वर काढतात. अशावेळी तब्येतीची काळजी घेणे खूपच गरजेचे असते. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि भरपूर पाणी पिणे आदी बाबींचे पालन करणे गरजेचे असल्याचे डॉक्टर देखील सांगतात.

उन्हाळ्यात ‘या’ आजारांची शक्यता

हिवाळा आणि पावसाळयाप्रमाणेच उन्हाळ्यातही अनेक आजार पसरण्याची शक्यता असते. यात उष्माघात, जंतुसंसर्ग, डायरिया, कावीळ, टायफॉईड, लहान मुलांमधील जंतुसंसर्ग, गोवर, कांजण्या, गलगंड, डोळ्यांचे आजार, त्वचेचे आजार, मुतखडा, लघवी मार्गाचा जंतुसंसर्ग इत्यादी समस्यांचा समावेश आहे.

काय काळजी घ्याल?

* या काळात शक्यतो पचायला हलका व कमी आहार घ्यावा. यामध्ये मुगाची खिचडी किंवा वरण-भात तसेच, सर्व पालेभाज्यांचे प्रमाण आहारात वाढवावे.

* टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, काकडी, द्राक्षे आदी फळांचे सेवन वाढवावे.

* थंड तुपाचाही आहारात समावेश करावा.

* नारळ पाणी, ऊसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा, जेवणानंतर ताकही घ्यावे.

* मांसाहार टाळावा. भरपूर पाणी प्यावे

अधिकाधिक पाणी प्या!

उन्हाळ्यात घामाच्या रुपाने उष्णता बाहेर पडत असते. त्यामुळे आतून व बाहेरून शरीराची त्वचा कोरडी पडते. अशावेळी उन्हाळ्यात शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते. त्यामुळे वेळोवेळी थंड पाणी पीत राहावे. थंड पाणी फ्रीज मधील नाही तर माठातील असावे. उन्हातून आल्यानंतर तत्काळ पाणी पिणे टाळावे.

उष्माघात टाळण्याठी काय कराल?

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच, शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल बिघडल्याने चक्कर येते. अचानक डोळ्यासमोर अंधारी येते. अशावेळी रुग्णाला थंड वातावरणात शांत झोपवावे, शरीर थंड पाण्याने पुसून घ्यावे. डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवावी.

उष्माघाताचा त्रास होत असलेल्या रुग्णाला जास्तीतजास्त द्रव आहार द्यावा, लिंबू सरबत घ्यावे, ताप आला तर डॉक्टरांना दाखवावे, उन्हात घराबाहेर पडणे टाळावे. या काळात डॉक्टरदेखील हाच सल्ला देतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha