Ketaki Chitale on Uddhav Thackeray : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. केतकी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर केतकीला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. केतकीने शरद पवार यांच्यावर टीका करणारी एक कविता तिच्या फेसबुकवरुन शेअर केली होती. त्यानंतर आता केतकीने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thacekray) यांच्यावर टीका केल्याचं पाहायला मिळतंय.
ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांना उमेदवारी देण्यात आलीये. त्यातच अमोल किर्तीकर यांच्या प्रचारात 1993 च्या 1993 च्या बाँम्बस्फोटातील आरोपी दिसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. 1993 च्या बॉम्बस्फोटचा आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरताना दिसत आहे, असा आरोप भाजपनं केला आहे. त्याचसंदर्भात केतकीने ही पोस्ट केली आहे.
केतकीची पोस्ट नेमकी काय?
केतकीने तिच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर ही पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की, 'लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला? लकी पेट्रोल पंप उडाला (जो आम्हाला त्यावेळी ट्रकचे टायर फुटले असावे वाटले आवाज ऐकून) त्यातील आरोपीला स्टार प्रचारक म्हणून मिरवताय? कीर्तीकरांना तसेच मी मत देणार नव्हतेच पण आज बाळासाहेबांमुळे जो काही ०.०००१ टक्के आदर मनात होता तुमच्याविषयी, तोही तुम्ही मातीत मिळवण्यात यशस्वी झालात. राग, चीड, द्वेष, संताप अशा भावना देखील मनात येत नाहीयेत; येते आहे ती फक्त कीव.'
शरद पवार यांच्यावरील टीकेप्रकरणी झाली होती अटक
अभिनेत्री केतकी चितळेनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टवरून तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. केतकी चितळेनं ही पोस्ट करुन समाजात द्वेषाची भावना आणि तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं असून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनंच केली आहे, असे म्हणत कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात कलम 505(2), 500, 501, 153 (अ) नुसार गुन्हा दाखल केला गेला होता. याप्रकरणी प्राथमिक पोलीस कोठडीनंतर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली.