Lata Mangeshkar Passes Away : संपूर्ण देशवासियांच्या डोळ्यात आज अश्रू आहेत. प्रत्येक भारतीयांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आहेत. देशवासियांचे जसे आज अश्रू वाहत आहेत, तसंच त्यावेळीही वाहत होते, ज्यावेळी लता मंगेशकर यांनी ए मेरे वतन के लोगो हे अजरामर गाणं गायिलं. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनाही अश्रू आवरता आले नव्हते. लतादीदी यांनी गायलेलं हेच गाणं, ज्यांनी लिहिलं ते म्हणजे कवी प्रदीप. कवी प्रदीप यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीताला लतादीदींच्या सुरांचा साज चढला आणि हे गाणं अमर झालं. आज अनोखा योगायोग म्हणजे ज्या कवींच्या लेखणीतून ए मेरे वतन के लोगो हे गाणं उतरलं, त्या कवी प्रदीप यांची आज जयंती. आणि ज्या गोड गळ्यातून हे गाणं प्रत्यक्ष श्रोत्यांच्या कानातून मनात पोहोचलं त्या लतादीदींचा अखेरचा दिवस. ज्या दिवशी प्रदीप जन्मले, त्या दिवशीच म्हणजे 6 फेब्रुवारीला लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला.
आज जरी हे दोन्ही तारे आपल्यात नसले तरी ते तिघेही अमर आहेत. ते तिघे म्हणजे गाणं लिहिणारे कवी प्रदीप, त्या गाण्याला सुवर्णसाज चढवणाऱ्या लतादीदी आणि ए मेरे वतन के लोगो हे गाणं... आज लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप दिला जातोय, तर आजच्याच दिवशी 107 वर्षांपूर्वी कवी प्रदीप यांचा जन्म झाला होता.
कवी प्रदीप यांनी लिहिलेलं आणि लतादीदींनी गायलेल्या या गाण्याशिवाय देशभक्तीवरील कोणताही कार्यक्रम होऊच शकत नाही.
कवी प्रदीप यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1915 रोजी मध्य प्रदेशातील बडनगरमध्ये झाला होता. तर 11 डिसेंबर 1998 मध्ये त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. 1940 मध्ये प्रदर्शित झालेल्या बंधन सिनेमामुळे कवी प्रदीप यांना ओळख मिळाली. मात्र ते लोकप्रिय झाले ते 1943 मध्ये आलेल्या किस्मत सिनेमातील 'दूर हटो ऐ दुनिया वालों हिंदुस्तान हमारा है' या गाण्यामुळे. या गाण्यामुळे त्यांना देशभक्तीपर गाणी लिहिणाऱ्या महानुभावांच्या पंक्तीत नेऊन ठेवलं.
कवी प्रदीप हे लहानपणी रामचंद्र नाराणय द्विवेदी या नावाने ओळखले जात होते. मात्र जसजसं कविता, गीतं लिहू लागले, तसतसं ते कवी प्रदीप म्हणून उदयास आले.
सिगारेट पाकिटावर अमर गीत -
लता मंगेशकर आणि कवी प्रदीप यांच्या ए मेरे वतन के लोगो या गाण्याची कहाणीसुद्धा भन्नाट आहे. 1962 मध्ये चीनविरुद्ध झालेल्या लढाईत शहीद झालेल्या भारताच्या जवनांना आर्थिक मदतीसाठी एका चॅरिटी शोचं आयोजन करण्यात आलं होतं. हा शो 27 जानेवारी 1963 रोजी नियोजित होता. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरु आणि राष्ट्रपती राधाकृष्णन येणार होते.
या कार्यक्रमासाठी दिग्गज कलाकारांनाही निमंत्रण होतं. यामध्ये महबूब खान, नौशाद, शंकर जयकिशन, मदन मोहन आणि सी रामचंद्र यासारख्या दिग्गजांचा समावेश होता. सी रामचंद्र हे उमदे संगीतकार होते, मात्र या कार्यक्रमासाठी त्यांना कोणतं गाणं मिळत नव्हतं. ऐनवेळी ते देशभक्तीसाठी प्रसिद्ध झालेल्या कवी प्रदीप यांच्याकडे गेले. त्यावेळी त्यांनी फुकटचं काम असलं की आमच्याकडे येतो, असा टोमणा रामचंद्र यांना मारला. मात्र त्यांनी गाणं लिहिण्यासाठी होकार दर्शवला.
असं सांगितलं जातं, कवी प्रदीप हे मुंबईतील माहिम समुद्रकिनारी फिरत होते त्यावेळी त्यांना गाणं सुचलं. त्याचवेळी त्यांनी सिगरेटच्या पाकिटावर शब्द रेखाटले... ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भरलो पानी...