UP Election : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. "जनतेच्या श्रद्धेची चिंता नसलेल्या या लोकांना भाजपला प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे पाहून आता स्वप्नात भगवान श्रीकृष्णाची आठवण येऊ लागली," अशी टीका नरेंद्र मोदी यांनी अखिलेश यादव यांच्यावर केली आहे. 


मथुरा, बुलंदशहर आणि आग्रा या विविध विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या 'जन चौपाल' या कार्यक्रमाला मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.  
 
गेल्या काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव म्हणाले होते की, भगवान कृष्ण त्यांच्या स्वप्नात दररोज येतात आणि म्हणतात की उत्तर प्रदेशात सपाचे सरकार स्थापन होणार आहे. अखिलेश आदव यांच्या याच वक्तव्याचा संदर्भ घेत नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली. 


पंतप्रधान मोदी म्हणाले, "निवडणूक पाहून कृष्णभक्तीचे गोडवे गाणारे लोक सरकारमध्ये होते, त्यावेळी ते वृंदावन, बरसाना, गोवर्धन आणि नांदगावला विसरले होते. आज भाजपला मिळालेला प्रचंड पाठिंबा पाहून या लोकांना आता स्वप्नातही श्रीकृष्णाची आठवण येत आहे. 


 "सरकारमध्ये हे लोक असताना त्यांना लोकांच्या विश्वासाची आणि गरजांची काळजी नव्हती. उत्तर प्रदेश लुटणे हा एकच यांचा  अजेंडा आहे. त्यांना फक्त सरकार बनवण्याची चिंता आहे. त्यामुळेच ते आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप सरकारला पाणी पिऊन शिव्याशाप देत आहेत. या लोकांनी उत्तर प्रदेशात जी स्थिती निर्माण केली आहे ती या खोट्या समाजवाद्यांच्या कृत्यांचा गठ्ठा आहे." अशी घणाघाती टीका नरेंद्र मोदी यांनी अखिलेश यादव यांच्यावर केली. 


पंतप्रधान मोदी म्हणाले, "मागील सरकारच्या काळात गुन्हेगारांचे मनोबल इतके वाढले होते, की ते महामार्गावर वाहने अडवून लुटायचे. महामार्गावर महिला आणि मुलींचे काय झाले हे बुलंदशहरच्या जनतेला माहीत आहे. त्यावेळी उत्तर प्रदेशात घरे आणि दुकानांवर अवैध धंद्यांचा धाक असत. त्यामुळे भीतीपोटी लोकांना घरे सोडून स्थलांतर करावे लागत होते. आग्रा दंगलीतील आरोपींच्या डोक्यावर कोणाचा हात होता हे चांगलेच माहीत आहे."


महत्वाच्या बातम्या