मुंबई : कौन बनेगा करोडपतीच्या 12 व्या सीझनची तयारी आता पूर्ण झाली आहे. या शो कडे तमाम भारतीयांचं लक्ष आहे. लॉकडाऊनमुळे हा शो सुरू व्हायला वेळ लागला. पण आता पूर्ण ताकदीनिशी या शोचं चित्रीकरण सुरू होणार आहे. लॉकडाऊनमध्ये प्रत्येकजण आर्थिक विवंचनेत सापडला. हे लक्षात घेऊन या शोचा स्लोगनही बदलण्यात आला आहे.


लॉकडाऊनमध्ये प्रत्येकाला मोठा सेटबॅक बसला. होता होता होणारी कामं रखडली. आर्थिक मिळकत थांबल्यावर प्रत्येकजण जवळपास सहा महिने मागे गेला. हाच सेटबॅक लक्षात घेऊन कौन बनेगा करोडपतीच्या 12 व्या सीझनची टॅगलाईन आता 'जो भी हो सेटबॅक का जवाब कमबॅक से देंगे' अशी असणार आहे. या शोची तयारी पूर्ण झाली आहे. या शोचं चित्रीकरण 7 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.



हा शो आता सुरू होण्यासाठीच्या हालचालींनी वेग घेतला आहे. या चॅनलच्या ट्विटर हॅंडलवरून या सेटची झलक शेअर करण्यात आली. त्यात करोडपतीच्या भव्यतेची कल्पना येते. बाराव्या सीझनचा हा सेट मोठा असून तो आकर्षक रोशनाईने युक्त आहे. या संपूर्ण सेटमध्ये निळ्या रंगाच्या शेड्स वापरण्यात आल्या आहेत. सेटवर काही दिवसांपूर्वी पूजाही करण्यात आली. ती पूजा करून आशीर्वाद घेऊन आता अंतिम तयारीला सुरूवात झाली आहे.



अमिताभ बच्चन 7 तारखेपासून स्पर्धकांशी हा शो खेळायला सुरूवात करतील. चित्रिकरणापूर्वीच या सेटवर दोन कोरोना पॉझिटिव्ह क्रू मेम्बर्स सापडल्याने थोडी खळबळ उडाली होती. परंतु, इथे काम करणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी करण्यात येत आहे. कौन बनेगा करोडपतीच्या 12 सीझनची चाहूल लॉकडाऊन काळातच लागली होती. याच काळात अमिताभ बच्चन यांनी आपल्या घरातून कौन बनेगा करोडपतीचे प्रोमो शूट करून दिले होते. त्यावरून त्यांच्यावर मोठी टीकाही झाली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करुन काम आलं की काम करायला हवं असं सांगत बच्चन यांनी हे प्रोमो करून दिले होते.



कौन बनेगा करोडपतीची लोकप्रियता लक्षात घेऊन मराठीतही सोनी मराठी चॅनलवर कोण होणार मराठी करोडपती सुरू झाला. यात हॉटसीटवर बसला होता नागराज मंजुळे. एकिकडे हिंदीचा 12 वा सीझन सुरू होत असतानाच मराठीतही अशी काही हालचाल चॅनल करतं का हे पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.