मराठी मुळाक्षरांच्या अ, आ, इ, ई पासून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मिळणारा धडा समजावून आणि मला समजून घेणाऱ्या माझ्या आयुष्यातील प्रत्येक गुरुला शिक्षक दिनानिमित्त विनम्र अभिवादन..
माझ्या आयुष्यातली पहिली गुरु, माझी शिक्षक, माझा आदर्श म्हणजे माझी आई. पाटीवरचा खडू हातात कसा धरायचा ते दरदिवशी समोर येणाऱ्या आव्हानांना विनम्रपणे कसं सामोरं जायचं ही शिकवण तिने दिली. आपले गुरु आपल्याला फक्त पांढऱ्या कागदावर शब्द कसे लिहायचे हे शिकवत नाहीत, तर या शिक्षणाच्या गंगेसोबत शिस्त, निस्वार्थीपणा, प्रामाणिपणा, मेहनतीला पर्याय नाही हाच धडा शिकवत असतात. कालानुरुप या बहुमूल्य शिकवणीचा अवलंब कुणी कसा करावा, हे ज्याचं त्याच्यावर. मराठी शाळेतून शिक्षण झालेले माझ्यासारखे विद्यार्थी आज जेव्हा आपल्या शाळा संस्कृतीला आठवतात तेव्हा साहजिकच शिक्षक, शिक्षण पद्धती आठवते.
आमच्या वेळी फेस टू फेस कम्युनिकेशन होतं, टीचर्स फक्त जॉब करत नव्हते तर फ्रंट बेंचपासून बॅक बेंचपर्यंत सर्व विद्यार्थ्यांवर त्यांचं लक्ष असायचं. आता तसं नाही हं.. मुलांचा अभ्यास पाहायचा की ऑफिस, घरातला गराडा सांभाळायचा? त्यातही मुलांचा बाबा उशिरा येतो. मुलांना ट्युशन लावलंय, सायन्स, मॅथ्ससाठी वेगळे क्लासेस.. मुलांसाठी सर्व काही करतोय, अशी वाक्य आता मित्र, मैत्रिणींच्या तोंडून सर्रास ऐकायला मिळतात. ते तरी काय करणार? संसाराचा गाडा चालवायचा असेल, तर दोन्ही चाकं धावणं गरजेचं आहे. यात कुणाचा दोष नाही पण काळानुरुप बदलणाऱ्या पद्धती आत्मसात करत असताना आपण आपल्या पाल्यांचे शिक्षक होतोय का, आपल्या मुलांना आपण स्मार्टफोन, लॅपटॉप, पर्सनल पीसी देऊन त्यांच्याकडून कोणते धडे गिरवून घेतोय, याचा आता विचार करण्याची खरंच वेळ आलीय.
शिक्षकांची शिकवण्याची पद्धत, त्यावेळचं शिक्षण याची तुलना होऊच शकत नाही. हे शक्यही नाही. पाटी, खडूची जागा वह्या, पेन्सिलने घेतली, ते जसं आपण स्वीकारलं तसंच आधुनिकीकरणातून शिक्षणाच्या पद्धतीही आपण आत्मसात करतोय. मात्र हे आधुनिकीकरण सर्वांसाठी आहे का? यंदाचं वर्ष कोरोना, लॉकडाऊनमध्ये जातंय. शाळा, कॉलेजेस अजूनही खुली झालेली नाहीत. ऑनलाईन शिक्षण सुरु झालं. मात्र खेड्या-पाड्यात, गरीब, मजुरांच्या मुलांची अवस्था काय झालीय, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय. ऑनलाईन शिक्षणासाठी काही शिक्षकांनी स्वतःहून एक मोबाईल उपलब्ध करुन दिला. आणि त्याशेजारी मुलांना एकत्र करुन मोबाईलवरुन विषयांचे तास घेतले. सिंधुदुर्गमधल्या मुलीने तर मोबाईलला रेंज मिळावी म्हणून भरपावसात टेकडीवर दिवसभर बसून ऑनलाईन धडे घेतले. गोरगरीब मुलांची तर व्यथा वेगळीच. गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावं म्हणून काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आणि लोकांना तुम्ही वापरलेले मात्र सुस्थितीत असलेले मोबाईल देण्याचं आवाहन त्यांनी केलं. माझ्या दृष्टीने हे सामाजिक कार्यकर्तेही एक प्रकारचे शिक्षक.. जे शिक्षण देण्यासाठी धडपडतायत.
राज्यातल्या काही भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थी नाहीत, काही भागात शिक्षक यायला तयार नाही, असं सांगत बंद पाडल्या गेल्या. एकीकडे हे चित्र असताना शिक्षक भरतीसाठी शेकडो बेरोजगार आजही आंदोलनं करतायत. पदवी जाळा आंदोलनापासून ते अगदी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हॅशटॅग ट्रेंडही चालवले. मात्र फलित काय?
सद्यस्थितीत शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी हा मुद्दा फक्त संवेदनशील न राहता अतिसंवेदनशील झालाय. शिक्षण द्यायचंय मात्र साधनसामुग्रीचा अभाव, शिकवायचंय मात्र संधी मिळत नाहीय, बेरोजगारी वाढतेय, शिकण्यासाठी काही विद्यार्थ्यांच्या घरात जास्त सोयीसुविधा तर काहींकडे वीजपुरवठ्याचीच वानवा...या नाण्याच्या दोन बाजू.
आपल्या शैक्षणिक व्यवस्थेत अमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. शिक्षक, विद्यार्थी, पालक आपापल्यापरीने मेहनत घेतायत. एवढंच कशाला तर, आजच्या घडीला ज्याच्याकडून काही शिकायला मिळतंय तो आपल्या आयुष्यातला शिक्षकच. मात्र आजच्या घडीला या ओल्या मातीला घडवण्याची जबाबदारी ही जशी प्रत्येक शिक्षकाची तशीच ती घरातल्यांची आणि प्रत्येक सुजाण, जागृत नागरिकाचीही.
शिक्षक दिन हा फक्त एक दिवस साजरा करुन नाही चालणार, तर किमान आजच्या दिवशी तरी आजी, माजी आणि भावी शिक्षकांच्या समस्यांवर उहापोह करुन ठोस तोडगा काढला गेला पाहिजे, जेणेकरुन पुढचे 364 दिवस त्यांच्या मनात शिकवणं हे फक्त कामाचा भाग नाही तर देशाचं भवितव्य आपण घडवतोय, हे चित्र डोळ्यासमोर असलं पाहिजे.
माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपलं कर्तव्यही बजावलं आणि आपली जबाबदारीही पार पाडली. आणि म्हणूनच त्यांचं नावाचं सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलं. प्रत्येक दिवसच शिक्षकदिन..मात्र तरीही आजच्या या विशेष दिनी ज्यांनी मला स्वावलंबी बनवलं, तत्व, नितीमत्तेनुसार माझ्या पायावर खंभीरपणे उभं राहायला शिकवलं ती माझी गुरु.. माझ्या आईला, आणि तमाम शिक्षकवर्गाला मनापासून सलाम..