मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला 2021 च्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळ्यात सन्मानित केलं जाणार आहे. दादासाहेब फाळके अवॉर्ड या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन ही माहिती देण्यात आली आहे. मात्र, हा सोहळा नेमका कधी होणार याची तारख जाहीर केलेली नाही.





कॅलिफोर्निया स्टेट असेम्ब्लीतर्फे सन्मान
या महिन्यात कॅलिफोर्निया स्टेट असेम्ब्लीतर्फे सुशांत सिंह राजपूतला मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने स्वीकारला होता. श्वेताने सोशल मीडिया याची माहिती देताना लिहिलं की, "भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कॅलिफोर्निया स्टेट असेम्ब्लीने माझ्या भावाला त्याच्या योगदानासाठी सन्मानित केलं."


सुशांतच्या चित्रपटांसाठी खास चित्रपट महोत्सवाचं आयोजन?
'बॉलिवूड हंगामा'ने केंद्र सरकराच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांतच्या चित्रपटांसाठी एका वेगळ्या फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येणार आहे. तसंच राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सिनेमातील महत्त्वाच्या योगदानासाठी विशेष पुरस्कारानेही सन्मान होणार असल्याचं कळतं.


फिल्मफेअरपासून सुशांत वंचित
अभिनेता म्हणून सुशांतने मनोरंजन विश्वात 11 वर्षे काम केलं. यामध्ये सुरुवातीची पाच वर्षे तो छोट्या पडद्यावर झळकला. पण सहा वर्षात 11 चित्रपट करुनही त्याला ना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला ना राष्ट्रीय पुरस्कार. मात्र त्याला दोन स्क्रीन अवॉर्ड मिळाले होते. याशिवाय 2017 मध्ये 'एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटासाठी मेलबर्नमध्ये इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने त्याला गौरवण्यात आलं होतं. 'एम एस धोनी' आणि 'काय पो छे' साठी त्याला फिल्मफेअर आणि आयफा पुरस्कारांमध्ये नामांकन मिळालं होतं.


14 जून रोजी सुशांतचा मृतदेह आढळला
14 जून रोजी मुंबईतील वांद्र्यातील राहत्या घरी सुशांत सिंह राजपूत मृतावस्थेत सापडला होता. सुरुवातीला मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. परंतु सुशांतच्या कुटुंबाने बिहारच्या पाटण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पाटणा पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरु केला. यानंतर मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात तणाव वाढला आणि अखेर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. यासोबतच ईडीही या प्रकरणात मनी लॉण्ड्रिंगचा तपास करत आहे.