Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: ज्याला देव मान्य नाही… त्याच्याच घरात बाप्पा आणण्याचा स्वामींचा हट्ट; समर्थांची अगाथ लीला, काय घडणार?
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: अक्कलकोटमध्ये दरोड्यांचा सुळसुळाट माजवणारा तरुण दरोडेखोर सावळ्या आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी सावकार गोवर्धनची मुलगी इराचं अपहरण करतो.

Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) 'जय जय स्वामी समर्थ' (Jai Jai Swami Samarth) मालिकेत अक्कलकोटमध्ये गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) मंगलमय वातावरणात मालिकेच्या कथानकात आता एक अत्यंत रंजक आणि भावस्पर्शी वळण येणार आहे. "उत्सव बाप्पाचा… लीला स्वामींची…" या मध्यवर्ती विचारातून गणपती बाप्पाचं आगमन केवळ एका घरात होणार नाही, तर एका दरोडेखोराच्या आयुष्यातही एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे.
अक्कलकोटमध्ये (Akalkot) दरोड्यांचा सुळसुळाट माजवणारा तरुण दरोडेखोर सावळ्या आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी सावकार गोवर्धनची मुलगी इराचं अपहरण करतो. योगायोगाने इरासोबत स्वामी समर्थांचंही अपहरण होतं. मात्र, स्वामींचं हे अपहरणही त्यांच्या इच्छेनेच घडलेलं असतं. सावळ्याच्या ताब्यात राहून स्वामी त्याच्या राग, द्वेष, सूड आणि हिंसक वृत्तीवर काम करू लागतात. याच दरम्यान इराच्या मनात तिच्या घरच्या गणपतीची ओढ आहे. आई-वडिलांपासून दूर असतानाही गणेशोत्सव साजरा करण्याची तिची इच्छा स्वामी ओळखतात. तिच्या मनातील ही इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी सावळ्याच्या घरातच गणपतीची स्थापना करण्याचा निर्णय घेतात. पण एक मोठा प्रश्न उभा राहतो, ज्या सावळ्याने आयुष्यात कधी देवासमोर हात जोडले नाहीत, तो आपल्या घरात गणपती बसवणार कसा?

स्वामी मात्र ठाम असतात. सावळ्याला जेव्हा स्वामी सांगतात की यंदा त्याच्या घरात गणपती येणार आणि गणपतीची मूर्ती तो स्वतः घेऊन येणार, तेव्हा तो स्वामींना स्पष्ट नकार देतो. "मी दरोडेखोर आहे. माझ्या हातून देवाची पूजा होणार नाही. मी गणपती बसवणार नाही..." असा त्याचा ठाम पवित्रा असतो. स्वामी मात्र मिश्कीलपणे त्याला जणू आव्हानच देतात आयुष्यभर देवासमोर हात जोडले नाहीत, हे भूषण नाही. आता हात जोडायचे! आणि त्याहूनही गूढ संकेत देताना स्वामी सांगतात की, "घरात विघ्नहर्ता येईल तेव्हाच तुझ्या आयुष्यातलं विघ्न दूर होईल..." सावळ्या आपलं विघ्न स्वतःच दूर करण्याचा निर्धार करून स्वामींचं आव्हान स्वीकारण्यास नकार देतो. पण स्वामी सुद्धा स्पष्ट सांगतात - "तेरी जिद से ज्यादा हमारी जिद बडी है… या घरात गणपती तर बसणारच, तू स्वतःहून बसवणार!"

इथून सुरू होते स्वामींच्या लीलेची अद्भुत अनुभूती. स्वामींच्या लीलेतून सावळ्याला एकामागून एक संकेत मिळत जातात. सावल्या गणपती घरी घेऊन येण्यासाठी होकार देईल का ? ह्यातून उठणार अनेक प्रश्न - एका दरोडेखोराच्या हातून स्वामी करवून घेतायत गणपतीची स्थापना… का? गणपतीच्या आगमनाने सावळ्याच्या आयुष्यात नेमका काय बदल होणार? स्वामी आणि सावळ्यामधला हा केवळ जिद्दीचा सामना आहे, की एका दरोडेखोराच्या परिवर्तनाची ही सुरुवात आहे? बाप्पाच्या आगमनाने सावळ्याच्या आयुष्यातील कोणतं विघ्न दूर होणार? कारण स्वामींच्या लीलेत प्रत्येक घटना केवळ घटना नसते त्यामागे एक संकेत असतो, एक हेतू असतो आणि योग्य वेळी उलगडणारं एक सत्य असतं.

"प्रारब्ध स्वामींशी जोडलेलं असेल, तर दुर्दैवाच्या फेर्यातून स्वामी भक्ताची सुटका करून त्याला सुदैवाशी जोडतात..." गणेशोत्सवाच्या निमित्ताने सावळ्याच्या घरात येणार आहे बाप्पा… पण त्याच्यासोबत येणार आहे श्रद्धेचा पहिला किरण, सद्बुद्धीची चाहूल आणि एका कठोर मनाच्या परिवर्तनाची सुरुवात. उत्सव बाप्पाचा… लीला स्वामींची… आणि बदल एका आयुष्याचा! गणपती बाप्पा मोरया! पाहायला विसरू नका.






















