Indrayani : 'इंद्रायणी' (Indrayani) ही मराठी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीने (Colors Marathi) पहिला प्रोमो आऊट करत मालिकेची घोषणा केली होती. आता या मालिकेचा नवा प्रोमो आऊट झाला आहे. 'इंद्रायणी'ची झलक दाखवणारा नवा प्रोमो मालिकाप्रेमींचं लक्ष वेधून घेत आहे.


अवखळ इंदूच्या भेटीसाठी महाराष्ट्र आतूर


अवघ्या महाराष्ट्राला सध्या एक कोडं पडलंय .. कोण आहे इंदू??? इंदू आहे एक निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ पण तितकीच विचारी मुलगी. वय लहान पण बुद्धी मात्र मोठ्यांनाही अचंबित करणारी. इंदूच्या निरागस तरी मार्मिक प्रश्नांनी भल्याभल्यांना पहिल्या प्रोमोतच निरूत्तर केलंय आणि तितकंच तिचं अस्सल आणि अवखळ बालपण अनेकांना आपल्या बालपणाची आठवणही करू देत आहे. म्हणून या इंदूच्या भेटीसाठी रसिकांना उत्कंठा लागून राहिली आहे.  अवघा महाराष्ट्र जिची आतुरतेने वाट पहातोय, ती  'इंद्रायणी' कलर्स मराठीवर 25 मार्चपासून सायंकाळी 7 वाजता अवतरणार आहे.


कलेचा, संगीताचा आणि विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला संत परंपरेचीही तितकीच मोठी परंपरा आहे. याच संत परंपरेने महाराष्ट्राला तत्वज्ञानाची, विचारांची  एक  बैठक घालून दिली आहे. याच वैचारिक संप्रदायाच्या संस्कारात वाढत जाणारी आहे, ही इंद्रायणी.  तिच्या हुशारीची, तिच्या लाघवी  स्वभावाची भुरळ  रसिकांना पडली नाही तरच नवल.


'इंद्रायणी'ची आणखी एक कमाल झलक नव्या प्रोमोमधून समोर


महाराष्ट्राच्या प्रत्येक घराला आणि घरातल्या प्रत्येकाला जोडणारी ही 'इंद्रायणी'  लवकरच छोट्या पडद्यावर अवतरेल पण तत्पूर्वीच या मालिकेच्या प्रत्येक प्रोमोने रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली आहे. कारण यात इंदूची भूमिका करणारी बालकलाकार सध्या लक्षवेधी ठरतेय. 


गुणी अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) आणि संदीप पाठक (Sandeep Pathak) या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना पुन्हा एकदा सुखद धक्का देतील. या दोन तगड्या कलाकारांबरोबर 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये चोळप्पाच्या भूमिकेद्वारे रसिकांची मनं जिंकणारा स्वानंद बर्वे हा कलाकारही या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचं लेखन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अभिनेता चिन्मय मांडलेकर करत आहे. विनोद लव्हेकर ‘इंद्रायणी’ या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.


इंद्रायणी
मालिका कधी होणार सुरु? 25 मार्च
कुठे पाहाल? कलर्स मराठी
किती वाजता? संध्याकाळी 7 वाजता


संबंधित बातम्या


Indrayani Colours Marathi Serial : कलर्स मराठीवर 'इंद्रायणी' मालिकेचा नवा प्रोमो, संदीप पाठक - अनिता दाते प्रमुख भूमिकेत, भरत जाधवही मालिकेत दिसणार?