Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण दिसत आहे. तर दिवसा उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, 25 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी (रविवार ते गुरुवार ) पर्यंतच्या पाच दिवसात संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यात ढगाळलेल्या वातावरणाबरोबर अवकाळी पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. 


25 ते 27 फेब्रुवारीदरम्यान, (रविवार ते मंगळवार) दरम्यानच्या पहिल्या तीन दिवसात वीजा आणि गडगडाटीसह मध्यम पावसाबरोबर गारपीट होण्याची शक्यताही जाणवत आहे. विशेषतः अमरावती, नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या 5 जिल्ह्यात ही शक्यता अधिकच जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.  


मराठवाड्यातही तुरळक पावसाची शक्यता


मराठवाड्यातील संपूर्ण 8 जिल्ह्यात 25 ते 27 फेब्रुवारीदरम्यान तीन दिवस केवळ ढगाळ वातावरणच राहून गडगडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासहित अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. विशेषतः जालना हिंगोली परभणी आणि नांदेड या 4 जिल्ह्यात ही शक्यता अधिकच जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. 


मध्य महाराष्ट्र 


26 ते 27 फेब्रुवारीदरम्यान केवळ दोनच दिवस खान्देश नाशिक नगर पुणे  सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा 10 जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी गडगडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासहित किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. तसेच जळगांव जिल्ह्यातही शक्यता अधिक जाणवत असल्याची माहिती खुळे यांनी दिली. 


मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता नाही


मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता नसून आकाश निरभ्र राहून किमान व कमाल अशी दोन्हीही तापमाने ही सरासरीच्या खाली म्हणजे 16-18 व 30 डिग्री से.ग्रेड दरम्यान राहून तेथील वातावरण आल्हादायक जाणवण्याची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले. 


राज्यात दुपारी उन्हाचा चटका तर पहाटे थंडीचा कडाका


सध्या महाराष्ट्रात दिवसा उष्णता तर रात्री व पहाटे चांगलीच थंडी जाणवत आहे महाराष्ट्रातील थंडीचा कालावधी हा दिवसागणिक वाढत आहे. किमान व कमाल अशी दोन्हीही तापमाने ही सध्य:काळातील सरासरी तापमानांच्या खाली घसरली आहेत. 12 ते 16 व 32 डिग्री से.ग्रेड दरम्यान जाणवत आहे. म्हणून अजूनही थंडी टिकून आहे. थंडी आपला हंगामी कार्यकाळ पूर्ण करुन सध्या जाणवत असलेल्या पाणी टंचाईच्या काळात रब्बी शेत-पिकांना नकळत काहींसी मदतच होत असल्याचे खुळे म्हणाले.
 


महत्वाच्या बातम्या:


Weather Update : देशभरात हवामानात सातत्याने बदल, राज्यात उकाड्यात वाढ, कुठे होणार पाऊस? हवामानाचे ताजे अपडेट जाणून घ्या