हनिमून से हत्या.. देशाला हादरवणाऱ्या मेरठ हत्याकांडावर येणार सीरिज ; पहिलं पोस्टर पाहून आठवेल थरार
बॉयफ्रेंडला हाताशी धरत नवऱ्याची हत्या, मृतदेहाचे 15 तुकडे निळ्या ड्रममध्ये, देशाला हादरवणाऱ्या घटनेची सिरीज zee 5 वर येणार आहे. सिरीजचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले.

Honeymoon se hatya: ‘हनीमून से हत्या’ मेरठच्या गाजलेल्या ‘नीला ड्रम’ हत्याकांडावर आधारित डॉक्यू-सीरिज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पतीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे निळ्या ड्रममध्ये लपवणाऱ्या या थरारक घटनेवर आधारित डॉक्यू-सीरिजचे पहिले अधिकृत पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून, त्यासोबतच रिलीज डेटही समोर आली आहे.
मेरठमधील शास्त्रीनगर परिसरात 4 मार्च 2025 रोजी घडलेला सौरभ हत्याकांड संपूर्ण देश हादरवून टाकणारा ठरला होता. या प्रकरणात मुस्कान हिने आपल्या प्रियकर साहिलसोबत मिळून पती सौरभ राजपूतची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते निळ्या ड्रममध्ये सीमेंटच्या मिश्रणात सील करण्यात आले होते. या भयानक हत्याकांडावर आधारित ही डॉक्यू-सीरिज आता लवकरच ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.
कधी आणि कुठे पाहता येणार?
ही डॉक्यू-सीरिज ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ZEE5 ने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये निळा ड्रम दाखवण्यात आला असून, सीमेंटमध्ये अडकलेला एक हात स्पष्टपणे दिसतो. पोस्टरवर “Honeymoon se Hatya: Why Women Kill” असा टायटल देण्यात आला आहे..
View this post on Instagram
यासोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, “सगळं काही हॅपी एंडिंगसारखं वाटत होतं, पण मग… तसं झालंच नाही.” ही डॉक्यू-सीरिज 9 जानेवारी रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.
पुन्हा आठवण करून देणारा थरार
या पोस्टरमुळे पुन्हा एकदा तो भयावह हत्याकांड लोकांच्या मनात ताजा झाला आहे. या प्रकरणातील आरोपी मुस्कान आणि साहिल सध्या तुरुंगात आहेत. शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर काही दिवसांतच मुस्कान गर्भवती असल्याचे समोर आले होते आणि तिने तुरुंगातच बाळाला जन्म दिला आहे. मात्र, बाहेर आता या गुन्ह्याची सविस्तर कहाणी डॉक्यू-सीरिजमधून दाखवली जाणार आहे.
अत्यंत चलाखीने रचला कट
मुस्कानने आपल्या प्रियकर साहिलसोबत मिळून सौरभच्या हत्येचा अत्यंत चलाखीने कट रचला होता. सौरभ 26 फेब्रुवारी 2025 रोजी मेरठला आला होता. तो मर्चंट नेव्हीत कार्यरत होता आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी घरी आला होता. मात्र, पत्नीच त्याच्या मृत्यूचा डाव आखत आहे, याची त्याला कल्पनाही नव्हती.
मुस्कानने कुटुंबाच्या विरोधात जाऊन सौरभशी लग्न केले होते, पण नंतर प्रियकरासोबत मिळून त्याची हत्या केली आणि दोघेही हिमाचल प्रदेशला फरार झाले. अखेर 18 मार्च रोजी या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश झाला.
मृतदेहाचे 15 तुकडे
मुस्कानने आधी सौरभला नशेची औषधे देऊन बेशुद्ध केले आणि नंतर त्याची हत्या केली. क्रूरतेचा कळस तेव्हा गाठला, जेव्हा तिने साहिलसोबत मिळून सौरभच्या मृतदेहाचे तब्बल 15 तुकडे केले आणि ते निळ्या ड्रममध्ये सीमेंटच्या मिश्रणात बंद केले.या थरारक, हादरवून टाकणाऱ्या घटनेची सविस्तर कहाणी आता ‘Honeymoon se Hatya’ या डॉक्यू-सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.























