Solapur : प्रेम ही प्रत्येकाच्या आयुष्यातली एक खास गोष्ट असते. या खास गोष्टीसाठी त्यामागे एक स्पेशल अशी स्टोरी देखील असते. कुणाचं कॉफीमुळे, कुणाचं पुस्तकामुळे अशी वेगवेगळी कारणं तुमच्या लव्हस्टोरीला कारणीभूत ठरतात. पण सोलापुरातील (Solapur) एका लव्हस्टोरीसाठी चायनीज आणि मंच्युरियन कारणीभूत ठरले आहेत. या लव्हस्टोरीची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.
मागील अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवर सुरु असलेला 'होम मिनिस्टर' (Home Minister) हा कार्यक्रम आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पैठणीसाठी रंगणारा हा खेळ आजवर अनेकांसाठी खास ठरला आहे. महाराष्ट्राचे लाडके आदेश भावोजी (Adesh Bandekar) यांचे प्रश्न आणि त्यावर वहिनींची धम्माल उत्तरं ही कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आली आहेत. अशाच एका वहिनींच्या लव्हस्टोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका वहिनींनी चायनीजचं कनेक्शन असणारी लव्हस्टोरी सांगितली. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सध्या सोशल मीडियावर वहिनींच्या या लव्हस्टोरीची तुफान चर्चा आहे.
वहिनींची लव्हस्टोरी काय?
वहिनींनी त्यांची लव्हस्टोरी सांगताना म्हटलं की, आमच्या लग्नाला अडीच वर्ष झालीत. आधी आठ वर्षांची आमची ओळख होती. मी चायनिज आणायला जात होते दुकानात तिथे ओळख झाली. मंच्युरियन आणायला जायचे. मग माझी मम्मी मला रोज मंच्युरियन आणायला पाठवायची. त्यावर आदेश भावोजी म्हणतात मग हे काय, मंच्युरिनयसोबत आलेत का? त्यावर कार्यक्रमात एकच हाशा पिकला. त्यावर वहिनी म्हणाल्या की, मंच्युरियनसोबत नुडल्स फ्री मिळाले. त्यावर पुन्हा आदेश बांदेकरांनी विचारलं की, ही स्किम फक्त सोलापुरात होती का? त्यावर वहिनी म्हणाल्या की, हो फक्त बाळ्यागावात होती. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या लव्हस्टोरीमुळे मंचावरचं वातावरण पूर्णपणे मिश्किल झालं.
व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, 'देवा हिला हिचा नूडल्स मिळाला, आमच्या आयुष्यात शेव तरी भेटेल का..' तर एका युजरने कमेंट करत म्हटलं की, 'आजपासून रोज चायनीज', दुसऱ्याने कमेंट करत म्हटलं की, 'चायनिज आणताना यांना भेटला, मला दळण, कोथिंबीर, भाजी सगळे आणून दमलो पण अजून कोणीच नाही भेटलं'. आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, 'बाळ्यातलं कुठलं चायनीज नाव सांगा आम्ही पण भेट देतो चायनीजला.'