Hemant Dhome on Sharad Pawar : पक्षात फूट पडल्यानंतर सध्या महाराष्ट्राचं राजकारण आणि लोकसभेची निवडणूक हे अनेकांच्या अस्मितेची लढाई झाली आहे. त्यातच शरद पवार (Sharad Pawar) हे देखील स्वत:च्या पक्षासाठी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकांसाठी मतदान हे शेवटच्या काही टप्प्यात आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. त्यासाठी शरद पवारांची बारामतीमध्ये सांगता सभा देखील पार पडली. पण त्यानंतर शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर आता दिग्दर्शक हेमंत ढोमेची (Hemant Dhome) पोस्ट चर्चेत आली आहे.
हेमंत ढोमेने शरद पवारांवर भावनिक पोस्ट लिहिली आहे. तसेच त्याने शरद पवारांना काळजी घेण्याचीही विनंती केली आहे. बारामतीमध्ये शेवटच्या टप्प्यात शरद पवारांनी सुप्रिया सुळेंसाठी तीन सभा घेतल्या. प्रकृती साथ देत नसतानाही शरद पवारांनी त्यांच्या प्रत्येक उमेदवारासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यासाठी पवारांना ऐकण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना त्यांनी नाराजही केलं नाही. पण शेवटची सभा पार पडण्यापूर्वीच शरद पवारांची प्रकृती बरीच बिघडली. त्यांच्या चेहऱ्यावरही बराच थकवा जाणवत होता. त्यामुळे शरद पवारांचे सोमवारचे सगळे नियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आलेत.
हेमंत ढोमेची पोस्ट काय?
हेमंत ढोमेने ट्विट करत शरद पवारांच्या प्रकृतीविषयी भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, आदरणीय साहेब, आपली मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना देखील थक्क करणारी आहे. पण कृपया स्वतःची काळजी घ्या… तब्येत जपा… खंडोबा आपणांस लवकरात लवकर बरे करो. हेमंत ढोमेच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट देखील केलीये.
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून शरद पवार हे राज्यभरात विविध ठिकाणी सभा घेत फिरत आहेत. बारामतीच्या सभेत बोलताना त्यांनी सांगितले की, मी किमान 40 सभा घेऊन आलो आहे. या सततच्या दगदगीचा परिणाम तब्येतीवर होत असतो. साहजिकच या सगळ्याचा परिणाम गळ्यावर होतो. त्यामुळे मी आज या स्थितीत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते.