ICC T-20 World Cup 2024: सर्व संघ 2 जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 (ICC T-20 World Cup) च्या तयारीत व्यस्त आहेत. मात्र बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनने (Shakib Al Hasan) त्याच्या संघाच्या तयारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने संघाच्या तयारीबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्डाशीही चर्चा केली आहे. ज्यानंतर शाकिबच्या एका विधानाची चर्चा रंगली आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी बांगलादेशचा संघ झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. त्यामुळे टी-20 स्पर्धेपूर्वी मोठ्या संघांसोबत सामने खेळले जावेत, असे शाकिब अल हसनचं मत असल्याचं बोललं जात आहे.
शाकिब अल हसन काय म्हणाला?
ढाका येथे शाकिब अल हसन बोलताना म्हणाला की, "झिम्बाब्वे आणि अमेरिकेविरुद्धची आमची कामगिरी लक्षात घेऊन विश्वचषकाचा विचार केला तर ते चुकीचे ठरेल. विश्वचषक वेगळ्या ठिकाणी खेळवला जाईल. दबाव चांगल्या पद्धतीने हातळल्यास संघाला त्याचा फायदा होईल. 2022 मध्ये टी-20 विश्वचषकात न्यूझीलंड आणि पाकिस्तान विरुद्ध खेळून आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. त्यामुळे निश्चितच आम्ही खूप चांगली तयारी करून विश्वचषकात गेलो होतो. मात्र यंदाच्या विश्वचषकाआधी असं होताना दिसत नाही, असं शाकिब अल हसनने सांगितले.
टी-20 विश्वचषक 2024 मध्ये बांगलादेशचे सामने
T20 विश्वचषकात बांगलादेशचा पहिला सामना 7 जून रोजी श्रीलंकेशी होणार आहे. दुसरा सामना 10 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. बांगलादेशचा तिसरा सामना 13 जून रोजी नेदरलँड्सविरुद्ध आणि चौथा सामना 16 जून रोजी नेपाळविरुद्ध होणार आहे.
टी-20 विश्वचषक 2024 चा फॉरमॅट असा असेल
आगामी टी-20 विश्वचषक 1 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. 20 संघांची ही स्पर्धा बाद फेरीसह एकूण 3 टप्प्यात खेळवली जाईल. सर्व 20 संघ प्रत्येकी 5 च्या 4 गटात विभागले जातील. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करतील. यानंतर, सर्व 8 संघ प्रत्येकी 4 च्या 2 गटात विभागले जातील. सुपर-8 टप्प्यात दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन संघ उपांत्य फेरीच्या दोन सामन्यांद्वारे अंतिम फेरीत प्रवेश करतील.
विश्वचषकाचा गट असा असेल
अ गट- भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब गट- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क गट- न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड गट- दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ