Sumeet Raghavan Birthday : हिंदी, मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे सुमित राघवन (Sumeet Raghavan) आज (22 एप्रिल) आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. 22 एप्रिल 1971 रोजी मुंबईत सुमित यांचा जन्म झाला. सुमितचे बाबा तामिळ, तर त्यांची आई कानडी होती. सुमित यांना बालपणापासूनच गायनाची आवड होती. यासाठी त्यांनी लहान वयातच शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही घेतले होते.
अभिनयाची आवड असणाऱ्या सुमित राघवन यांनी ‘बालकलाकार’ म्हणून रंगभूमी गाजवण्यास सुरुवात केली. 1986मध्ये त्यांनी थिएटर जॉईन केलं. पहिल्याच नाटकासाठी त्यांना बालकलाकाराचा पुरस्कार देखील मिळाला होता. रुपारेल महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करणाऱ्या सुमित यांना गाणी आणि गझल गायला आवडते.
‘बालकलाकार’ म्हणून मालिकाविश्वात पदार्पण!
1983मध्ये आलेल्या ‘फास्टर फेणे’ या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पाऊल ठेवेले. यानंतर सुमित यांनी अनेक नाटकं, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका आणि रियॅलिटीशोमधून काम केले. या दरम्यानच्या काळात सुमित यांना अनेकदा अपयश सुद्धा आलं, पण त्यांनी सतत प्रयत्न करत आपलं स्थान इंडस्ट्रीमध्ये अबाधित ठेवलं.
‘या’ क्षेत्रातही सक्रिय!
नाटक, चित्रपट आणि मालिकाच नाही तर सुमित राघवन डबिंग क्षेत्रातही कार्यरत आहेत. त्यांनी अनेक हॉलिवूड चित्रपटातील पात्रांना आपला आवाज दिला आहे. ‘ब्ल्यू स्ट्रीक’, ‘शांघाई नून’, ‘रश हवर’, ‘हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स’, ‘शांघाई नाईट्स’ अशा काही चित्रपटांमध्ये आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळतो. झी मराठीवर प्रसारित झालेल्या ‘सारेगमप’ सेलिब्रिटी विशेष पर्वात त्यांनी स्पर्धक म्हणून भाग देखील घेतला होता.
‘महाभारता’त साकारलीय भूमिका!
कोरोना काळात लॉकडाऊन लागला आणि लोक घरात कैद झाले होते. या काळात टीव्हीवर पुन्हा एकदा ‘महाभारत’ प्रसारित करण्यात आले. या महाभारतात सुमित राघवन यांनी देखील खास भूमिका साकारली होती. ‘महाभारता’त त्यांनी कृष्णाचा सखा ‘सुदामा’ साकारला होता. सुमित राघवन यांनी पुन्हा एकदा त्यांच्या बालकलाकाराच्या रुपात पाहून प्रेक्षक आणि चाहते देखील खूप झाले होते. त्यांच्या या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले होते.
सुमित यांनी ‘रंग उमलत्या मनाचे’, ‘ज्वालामुखी’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘हॅम्लेट’ यांसारखी नाटके, तर ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’, ‘तू तू मै मै’, ‘सजन रे झूठ मत बोलो’, ‘बडी दूर से आए है’, ‘वागले की दुनिया’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे. ‘आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’, ‘बकेट लिस्ट’, ‘आपला माणुस’, ‘संदूक’ या चित्रपटांतील त्यांच्या अभिनायचे खूप कौतुक झाले.
हेही वाचा :