SEBI issues notice to former NSE chief : सेबीकडून एनएसईचे माजी प्रमुख रवी नारायण यांना नोटीस पाठवत स्टाॅक एक्सचेंजमधील गव्हर्नन्स लॅप्सेसशी संबंधित प्रकरणी 2.06 कोटी रुपये भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 15  दिवसात रक्कम न भरल्यास अटक करण्याचा, सोबतच मालमत्ता आणि बॅंकखाती जप्त करण्याचा देखील इशारा सेबीकडून देण्यात आला आहे. 


11  फेब्रुवारीला सेबीकडून चित्रा रामकृष्णसोबत रवी नारायण यांना देखील दंड लावत, 2 कोटी रुपये दंड भरण्याची नोटीस पाठवली होती. मात्र, ती रक्कम न भरल्याने सेबीनं त्यांना पुन्हा नोटीस पाठवत दंड न भरल्यास अटक करण्याचे नोटीशीत सांगितले आहे. ह्यात 2 कोटी दंडाची रक्कम आहे तर 6 लाख रुपये त्यावरील व्याज देखील भरण्याचे निर्देश रवी नारायण यांना सेबीनं दिले आहेत. 


देय रक्कम न भरल्यास रवी नारायण यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करत आणि विकत रक्कम सेबी वसूल करेल असं आपल्या निर्देशात म्हंटलं आहे. याशिवाय नारायण यांच्या बँक खात्यांवर टाच आणत त्यांना अटक करण्यात येईल असं देखील नोटीशीत स्पष्ट केलंय. 


सेबीनं याच प्रकरणात नारायण यांच्यासोबतच एनएसईच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांना 3 कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. एनएसईची गोपनीय माहिती अज्ञात व्यक्तीसोबत शेअर केल्याने त्यांच्यासोबत दोन जणांना प्रत्येकी 2 कोटींचा दंड ठोठावला होता. 


रवी नारायण हे एप्रिल 1994 ते मार्च 2013 पर्यंत नॅशनल स्टाॅक एक्सचेंजचे एमडी आणि सीईओ होते. एप्रिल 2013 पासून एनएसईच्या संचालक मंडळावर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती आणि जून 2017 पर्यंत ते यापदावर होते. दुसरीकडे, त्यांच्यानंतर एमडी आणि सीईओ पदावर चित्रा रामकृष्ण एप्रिल 2013 ते 2016 डिसेंबरपर्यंत कार्यरत होत्या. चित्रा रामकृष्ण ह्या सध्या गोपनीय माहिती अज्ञात व्यक्तीसोबत शेअर केल्याप्रकरणी ईडी आणि सीबीआयच्या रडारवर आहेत. 


चित्रा रामकृष्ण आणि आनंद सुब्रमण्यम यांच्याविरोधात सीबीआयनं चार्जशीट देखील दाखल केले आहे. रामकृष्ण आणि सुब्रमण्यम हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. चित्रा रामकृष्ण यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत गोपनीय माहिती ब्रोकर्सपर्यंत पोहोचवली असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांना सीबीआयनं ६ मार्च रोजी अटक केली होती तर आनंद सुब्रमण्यम यांना २५ फेब्रुवारी रोजी अटक केली होती.